विधानसभा निवडणूक गांभीर्याने घ्या, राष्ट्रीय संघटन सचिवांची भाजप नेत्यांना तंबी

वर्धा/प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले. संघटना कार्यावर विशेष भर देणाऱ्या भाजपने ही निवडणूक लक्षात घेवून संघटनेच्या राजकीय पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यास पाठविणे सुरू केले आहे. भापजचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश हे आज वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास धडकले. माजी खासदार रामदास तडस यांच्या फार्महाऊसवर दरवाजे बंद करून ही गोपनीय स्वरूपातील बठक आटापली. सर्वप्रथम शिवप्रकाश यांनी आगामी विधानसभा निवडणूक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घ्यावी, अशी एकप्रकारे तंबीच त्यांनी उपस्थित वरिष्ठ नेत्यांना दिल्याचे समजले.

भाजपमध्ये मंडळपातळीवर पक्षकार्य चालते. मंडळप्रमुख असतोच. आता शिवप्रकाश यांनी या प्रमुखाच्या दिमतीला प्रभारी प्रमुख नेमण्याची सूचना केली. अन्य मंडळातील प्रमुख पदाधिकारी हा दुसऱ्या मंडळाचा प्रभारी राहणार. निवडणूकीत त्या मंडळा अंतर्गत चालणाऱ्या कार्याचे नियोजन करण्याची जबाबदारी या प्रभारी मंडळ प्रमुखावर राहणार आहे. तशी सूचना शिवप्रकाश यांनी केली. आगामी निवडणूकीसाठी भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यातील एका मंत्र्याकडे महाराष्ट्रातील एका जिल्ह्याची जबाबदारी राहणार.

वर्धा जिल्ह्यासाठी मध्यप्रदेशातील मंत्री प्रल्हाद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सुद्धा आजच्या बठकीत सहभागी झाल होत. उपस्थित पदाधिकाऱ्याना मत व्यक्त करण्याची संधी मिळाली नव्हती. केवळ शिवप्रकाश व पटेल यांनीच मार्गदर्शन केले. माजी खासदार रामदास तडस, लोकसभा क्षेत्रप्रमुख सुमीत वानखेडे, उपेंद्र कोठेकर तसेच आमदार डॉ.पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार, राजेश बकाने, अविनाश देव, मिलिंद भेंडे, जयश्री येरावार प्रामुख्याने उपस्थित होते. व्यक्तीगत भेटी टाळण्यात आल्या.

मात्र आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी विनंती करीत शिवप्रकाश यांची भेट घेतलीच. आर्वी विधानसभा मतदारसंघात दादाराव केचे यांची तिकिट कापून ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमीत वानखेडे यांना मिळणार असल्याची जोरात चर्चा आहे. वानखेडे यांनी वैद्यकीय महाविद्यालयासह विविध कामांचा आरंभ आर्वीत केल्याने त्यास एक प्रकारे पुष्टीच मिळत असल्याचे म्हटल्या जाते. त्याविरोधात आ.केचे यांनी जाहीरपणे अनेकदा आगपाखड केली. या पूर्वी विविध बैठकांसाठी आलेल्या पक्षाच्या निरीक्षकांना भेटून त्यांनी नाराजी नोंदविली. तसेच संतापही व्यक्त केला. मात्र केचेंच्या संतापावर किंवा नाराजीवर सुमीत वानखेडे यांनी चकार शब्दानेही आजवर प्रतिक्रिया दिली नाही. आज शिवप्रकाश यांच्याकडे केचेंनी मांडलेल्या भुमिकेची वाच्यता झालेली नाही.