चांद्रयान-३ च्या लँडिंग सोहळ्यासाठी देशभरात उत्साह

नवी दिल्ली/प्रतिनिधी भारताची महत्वाकांक्षी अंतराळ मोहिम असलेल्या चांद्रयान ३ चं उद्या प्रत्यक्ष चंद्रावर लँडिंग होणार आहे. याची देशभरात मोठी चर्चा असून या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. हिंदू मंदिरांमध्ये अनेकांनी यासाठी होमहवन केले होते आता उत्तर प्रदेशातील लखनऊच्या इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया इथं मुलांनी नमाज पठण केलं. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

चांद्रयानाच्या यशस्वितेसाठी करण्यात आलेल्या या नमाज पठणाबाबत बोलताना लखनऊ ईदगाहचे इमाम खालीद रशीद फिरंगी महाली यांनी सांगितलं की, इस्लामिक सेंटर मदरशात मुलांनी नमाज पठण केलं तसेच चांद्रयानाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी प्रार्थना केली. या मुलांना इथं विज्ञानही शिकवलं जात त्यामुळं एकूणच भारताच्या या मोहिमेबाबत या मुलांमध्ये उत्सुकताही आहे. या मोहिमेसाठी मेहनत घेतलेल्या इस्त्रोच्या सर्व वैज्ञानिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आत्तापर्यंत कोणीही न पोहोचू शकलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जर उद्या चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी झालं तर भारत ही कामगिरी करणारा पहिला देश ठरणार आहे.