मार्गांवरील ब्लॅक स्पॉटवर तातडीने उपाययोजना करा- खा. रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी काही मार्गांवर वारंवार अपघात होणा-या अपघात प्रवण स्थळांवर संबंधित विभागांनी अपघात होऊ नये यासाठी विशेष लक्ष देऊन तातडीच्या उपाययोजना केल्या पाहिजे. अस्तित्वातील अशा स्थळांसह जेथे वारंवार अपघात घडतात अशा स्थळांची माहिती एकत्रित करुन अपघात होणार नाही यासाठी विभागांनी प्रयत्न केले पाहिजे, अशा सूचना संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांनी केल्या. समितीची बैठक खा. तडस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहण घुगे, अपर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मो. समिर मो. याकुब, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, लिंबाजी सोनवने, अशासकीय सदस्य प्रणय जोशी, शिरीष भांगे, किरण उरकांदे यांच्यासह बांधकाम, परिवहन, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हयात जुने ३६ व नविन २६ असे ६० अपघात प्रवणस्थळे आहेत. या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने केल्या गेल्या पाहिजे. पुढे अपघात होणार नाही याची काळजी बांधकाम व परिवहन विभागाने घ्यावी. अनेक ठिकाणी रस्त्यालगत मोठे झाडे आहेत.

या ठिकाणी झाडांवर वाहन आदळून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे रेडीअम सारख्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात याव्या. मार्गालगत ठिकठिकाणी पथदिवे बसविण्यात आले आहे. यातील बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरु करण्याच्या सुचना खा. तडस यांनी बैठकीत केल्या. मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत ठिकठिकाणी ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाची कामे करण्यात आली आहे. या रस्त्यांच्या क्षमतेच्या अधिक वजनाची वाहतुक होत असल्याने रस्ते खराब होतात हे टाळण्यासाठी अशा प्रत्येक रस्त्यावर वाहतुक क्षमता दर्शविणारे फलक लावण्यात यावे. रस्त्यांचे डिपीआर होत असतांना सबंधित विभागांनी ते काळजी पूर्वक तपासून आवश्यक बाबी त्यात समाविष्ठ केल्या पाहिजे. अशा सूचनाही त्यांनी केल्या. पावसाळयाच्या दिवसांमध्ये काही ठराविक रस्ते दरवर्षी नादुरुस्त होतात. काही ठिकाणी रस्ता, पूल वाहून गेल्याच्या घटना घडतात. दरवर्षी अशा घटना घडणारे रस्ते व पुलांची माहिती एकत्रित करुन या रस्त्यांना वाहतुकीसाठी पर्यायी ठरणा-या मार्गांची माहिती रस्ता सुरक्षा समिती समोर ठेवण्यात यावी. पवनार ते सेवाग्राम, वर्धा ते सेवाग्राम, कारंजा ते नारा रोड, आर्वी ते तळेगाव यासह ठिकठिकाणी आवश्यक त्या रस्त्यांवर सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अवैध वाहतुकीवर सीसीटीव्ही च्या माध्यमातून नजर ठेवल्या जावी, असे ते म्हणाले.