राज्यभर पावसाची तुफान बॅटिंग, मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट तर पुढचे पाच दिवस राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई/प्रतिनिधी काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज संपूर्ण दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसंच मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पवासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर, सातारा, पुणे आणि रायगडसाठी बुधवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोली आणि चंद्रपुरात पुढील ४८ तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबई आणि ठाण्यात आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन्ही दिवस १०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तळ कोकणात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सोबतच मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून नद्याही दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र बघायला मिळतंय. तर दुसरीकडे जुलै महिन्याचा तिसरा आठवडा उलटून देखील नाशिककर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्याचा धरणसाठा ७३ टक्के होता. अनेक धरणांमधून विसर्गही सुरू करण्यात आला होता, मात्र यंदा जलसाठा फक्त ३३ टक्के एवढा असल्याने चिंता व्यक्त केली जातेय. पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नायगावजवळ पाणी साचल्यानं वाहचालकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतोय. लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील विक्रमी पाऊस. गेल्या २४ तासांत तब्बल २१४ मिलिमीटर पावसाची नोंद. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खूपच कमी पावसाची नोंद. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत २ हजार ५१५ मिमी पाऊस बरसला होता.