जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते बंदींना प्रमाणपत्राचे वितरण

वर्धा/प्रतिनिधी जिल्हा कारागृहातील शिक्षा सुनावलेले बंदी तसेच अंडर ट्रायल असलेल्या बंदीना कारागृहातून सुटका झाल्यावर समाजात आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर व सोशल मीडिया एक्झिकेटीव्ह या विषयाचे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वितरण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.सागर कवडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, जिल्हा कारागृह अधिक्षक सुहास पवार, जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त निता औघड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र आचार्य, प्लाटीनम कॉम्पुटरचे संचालक अजित नेरकर, रुप ेश रामगडे आदी उपस्थित होते.

कारागृहातून सुटका झाल्यानंतर समाजात आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी त्यांना हक्काचा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात ३० बंदीवानांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून सदर प्रशिक्षण प्लाटीनम इन्स्टीट्यूट वर्धा या खाजगी संस्थेच्यावतीने देण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि दिर्घ मुदतीचे प्रशिक्षण देणारा वर्धा जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व बंदीवानांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजून घेत कारागृह अधिक्षकांना योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जास्तीत जास्त बंदीवानांनी कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभघेण्याचे आवाहन केले. भविष्यात सुध्दा बंदिवानांना कौशल्य विकासप्रशिक्षण देण्यात यावे अशा सुचनात्यांनी केल्या.

कारागृहात हिरकणी कक्षाचे उद्घाटन प्रमाणपत्र वितरण

कार्यक्रमानंतर कारागृहामध्ये स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. या कक्षाची स्थापना कारागृहातील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी करण्यात आली आहे. कार्यक्रमाला कारागृहातील अधिकारी, कर्मचारी, बंदी उपस्थित होते.