सप्तखंजेरी वादक भाऊसाहेब थुटे यांची मनोरंजनातून जलजागृती

वर्धा/प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित धाम नदी संवाद यात्रेला प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यात्रेने नदीच्या उगमापासून १८ गावांचा टप्पा पार केला. आंजी (मोठी) येथे यात्रा दाखल झाल्यानंतर गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. याठिकाणी सप्तखंजेरी वादक भाऊसाहेब थुटे यांच्या मनोरंजनातून जलजागृती कार्यक्रमाचा गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. यावेळी आंजीचे सरपंच जगदीश संचेरिया, नदी समन्वयक मुरलीधर बेलखोडे, सुनील रहाणे, अजय रोकडे, विजय रोकडे, सतीश इंगोले, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव नागपुरे, विजय दुर्गे, प्रेरणा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील भांदकर, उपाध्यक्ष गणेश चंदनखेडे उपस्थित होते. यात्रा गावात दाखल झाल्यानंतर गावफेरी काढण्यात आली. जलजागृती रथाने नदीचे महत्व, अभियानाचा उद्देश यावर प्रकाश टाकला. यावेळी गावकरी, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावकऱ्यांशी संवाद साधून नदीची माहिती, जैवविविधता, पाण्याचे स्त्रोत, नदी प्रदुषणाची कारणे, उपाययोजना याबाबत माहिती घेण्यात आली व गावकऱ्यांकडून प्रश्नावली देखील भरून घेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी आंजी येथे सप्तखंजेरी वादक भाऊसाहेब थुटे यांचे बहारदार किर्तन झाले. मनोरंजनातून नदीचे महत्व त्यांनी विषद केले.

गावकऱ्यांनी आपल्या गावातील नदी स्वच्छ, सुंदर ठेवावी यासाठी त्यांनी गावकऱ्यांचे प्रबोधन केले. तत्पुर्वी नदी समन्वयक मुरलीधर बेलखोडे, सुनील रहाने यांनी गावकऱ्यांना चला जाणूया नदीला अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या धाम नदी संवाद यात्रेचा उद्देश, महत्व, नद्यांचे पावित्र्य, प्रदुषण, त्यासाठी उपाययोजना व गावकऱ्यांचा सहभाग याबाबत माहिती दिली. गावकऱ्यांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, गावकऱ्यांच्या सहभागाशिवाय अभियान यशस्वी होऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. आंजी येथे दाखल होण्यापुर्वी संवाद यात्रेने खैरी कामठी या गावाची परिक्रमा केली. यावेळी कामठीच्या सरपंच चंद्रकला इवनाते व त्यापुर्वी परिक्रमा झालेल्या प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी संवाद यात्रेस मोठे सहकार्य केले. आंजी येथे सरपंच जगदीश संचेरिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

संचलन सुनील भांदकर यांनी केले. किर्तनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन मतीन शेख, प्रवीण बोरकर, शंकर रघटाटे, दीपक घारे, गणेश जयस्वाल, किशोर ठाकरे, बंडू मुळे, चेतन थूल, यश मडावी यांनी सहकार्य केले. यावेळी धाम नदी संवाद यात्रेच्या घडिपुस्तकेचे प्रकाशन करण्यात आले. शेवटी बाळकृष्ण हांडे, प्रकाश वैद्य यांनी सामुदायिक प्रार्थना घेतली त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.