सावंगी येथे माता रमाईच्या स्मृतिकार्याचा जागर

वर्धा/प्रतिनिधी सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघाद्वारे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दत्ता मेघे सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विनया भरणे सिन्हा यांनी ‘मी रमाई बोलते’ या एकपात्री नाटिकेतून रमाबाई आंबेडकर यांचा जीवनपट मांडला आणि उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत भरघोस यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यात आदित्य चव्हाण, आस्था थूल, अनुष्का वानखेडे, अनन्या सांगोले, तन्वी बनसोड या मेघे समूहातील कर्मचारीवृंदाच्या पाल्यांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला मेघे अभिमत विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, संयोजक डॉ. अमोल लोहकरे, डॉ. उल्हास दुधेकर, डॉ. यशवंत लामतुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उत्कृष्ट सादरीकरणाकरिता विनया सिन्हा यांचा डॉ. अभ्युदय मेघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी चंदा पाटील यांनी स्वरचित रमाईगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लोहकरे यांनी केले. संचालन माधुरी मेश्राम व रीता वाघ यांनी केले तर आभार सिस्टर वनिता यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी संघाच्या सदस्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.