साहित्य संमेलनातून सामुदायिक प्रार्थनेचा जागर

वर्धा/प्रतिनिधी धन पैसा, अदला, प्रतिष्ठा नसून प्रार्थनेचे संस्कार हेच गावाचं धन आहे. विशाल अंतकरणाची माणसं घडविण्याचे काम ही प्रार्थना आहे. माणसं शरीराने माणसं असली तरी संस्काराचे बिज मानवतेचे असतात की नाही, असा प्रश्न आहे. त्यामुळेच जगात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. अनेक प्रकारच्या समस्या जन्म घेताना दिसतात. ज्यातून माणसं सुखाकडे नाही, प्रगतीकडे नाही तर अधोगतीकडे जाताना दिसतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेला धन म्हटलं आहे. त्यामुळे ही सामुदायिक प्रार्थना गावखेड्यात, शहरशहरातून गायली जावी, अशी तुकडोजी महाराजांची इच्छा होती, असे सांगून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थनेचा साहित्य संमेलनात प्रकाश वाघ महाराजांनी जागर केला. गुरुवार २ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्व. मनोहर म्हैसाळकर सभा मंडपात सामुहिक प्रार्थनेचा कार्यक्रम संपन्न झाला. माणसं माणसांपासून दूर होत आहे. धर्म, धर्मापासून दूर होत आहे.

संप्रदाय संप्रदायापासून दूर होत आहेत. संप्रदायामध्ये अनेक प्रकारच्या विचारधारा या देशामध्ये बघायला मिळतात. आपल्या विचारधारेचा हट्ट हा त्याहीपेक्षा घातक आहे म्हणून तो हट्ट नसावा. जी गोष्ट समाज स्विकारत नाही ती गोष्ट राष्ट्रसंताने या प्रार्थनेत टाकली आहे. म्हणूनच मानवतेचे रक्षण करणारी जातीयवाद संपवणारी, धर्मा-धर्मातील तेढ संपविणारी ही प्रार्थना आहे. संस्थान हेच आपलं घर आहे. आपण आपल्या मुलांसाठी कितीही कमावून ठेवले असेल जर संस्कार जर नसेल तर त्या धनाचा उपयोग कवडीमात्र आहे. त्यामुळे तशाप्रकारचे सुख, आनंद मिळावा म्हणून तुकडोजी महाराजांनी प्रार्थनेला धन म्हटले आहे.

प्रार्थना ही गावाचे धन समजतो. सर्व धर्माचा समन्वय, विेशशांतीचा उपाय, लोकसुधारणेचे विद्यालय म्हणजे सामुदायिक प्रार्थना होय. लोकांना शक्ती, बुद्धी देण्याचं काम ही प्रार्थना करते. म्हणून महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तुकडोजी महाराजांना मी तुम्हाला मोठं आश्रम देतो, मी तुम्हाला पाहिजे तेवढी जमीन देतो, तुमच्या विचारधारेचा एक मोठा आश्रम सुरू व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. मात्र, तुकडोजी महाराजांनी एकच मागणी मागीतली. मला आश्रम नको, माझे गरीब बांधव लोकवर्गणीतून भव्य आश्रम उभारेल. सामुदायिक प्रार्थना महाराष्ट्राच्या या देशाच्या गावोगावात, प्रत्येक खेड्यात, शहराशहरात गायली जावी, एवढीच माझी अंतिम इच्छा आहे. एवढं महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेवर प्रेम केलं असल्याचे, प्रकाश वाघ महाराजांनी यावेळी सांगितले.