शेतकऱ्यांनी शेती सोबतच शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारावे- वैभव लहाने

वर्धा/प्रतिनिधी डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा अंतर्गत शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची सभा सेलसुरा येथील प्रगतिशील शेतकरी माधव घोडे यांच्या शेतावर घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक वैभव लहाने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शेती सोबतच शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारावे, असे यावेळी श्री.लहाने यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जफेड करतांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याबाबीवर देखील यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. कृषि व कृषि उद्योगाविषयी नवीन तंत्रज्ञान जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे या उद्दिष्टाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू यांनी शेतकरी शास्त्रज्ञ मंच ही संकल्पना उदयास आणली.

सदर उद्धिष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने कृषि विज्ञान केंद्रामार्फत प्रत्येक महिन्यामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा डॉ. डी. बी. उंदिरवाडे, संचालक (विस्तार शिक्षण) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येते. सध्या परिस्थिती मध्य े अवकाळी पाऊस व त्यानुसार करावयाच्या उपाययोजना याबाबत वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी माहिती दिली. यादरम्यान शेतकऱ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन देखील केले. बँक सहयोगाने विविध योजना राबविण्यात येतात त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या प्रसंगी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष दिलीप पोहाणे यांनी कपाशी लागवड बाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ.अंकिता अंगाईतकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. प्रेरणा धुमाळ, डॉ. रुपेश झाडोदे, डॉ. निलेश वझीरे, डॉ. सचिन मुळे, गजानन म्हसाळ, दिनेश चराटे, गजेंद्र मानकर यांनी योगदान दिले.