पंधरा दिवसांमध्ये दोन मोठे राजकीय स्फोट- प्रकाश आंबेडकर

पुणे/प्रतिनिधी येत्या पंधरा दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये दोन मोठे स्फोट होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. सध्या अजित पवार यांच्याविषयी राजकीय वतरुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवार भाजपमध्ये जाणार असं भाकित केले जात आहे. विशेषत: ते मागच्या आठवड्यात अचानक नॉट रिचेबल झाल्याने सगळ्यांनाच संशय येतोय. परंतु अजित पवारांनी अशा बातम्यांना वावड्या म्हटले आहे. दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये कुटुंबातील सदस्यांवर भाजपकडून दबाव येत असल्याचे शरद पवार म्हणाले असल्याचा दावा संजय राऊतांनी केला. कुटुंबातील सदस्य भाजपमध्ये गेले तरी पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असं पवार म्हटले असल्याचे राऊतांनी सांगितले.                            आणखी महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील भाजपचे नेते सध्या अजित पवार यांचे गुणगाण गात असल्याचे दिसून येते. अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. त्यावरुन काहीतरी शिजतंय असंच दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पुढच्या पंधरा दिवसांमध्ये राज्यामध्ये दोन मोठे राजकीय स्फोट होणार आहेत. दोन ठिकाणी दोन मोठे स्फोट होतील, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. एका दाव्याबाबत अजित पवारांचे नाव राजकीय जाणकार जोडत आहेत. मात्र दुसर्या दाव्याबाबत काहीही स्पष्टता दिसून येत नाही. पुणे र्शमिक पत्रकार संघ येथे एका पुस्तक प्रकाशनासाठी आंबेडकर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण, उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.