वर्ध्यात प्रथमच “टायगर’ला पिंजराबंद करण्याची वेळ

वर्धा/प्रतिनिधी देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख. या प्रकल्पात १६ वाघांचे वास्तव्य आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन १३ हजार ८०० हेक्टर, तर बफर झोन ६७ हजार ८१४.४६ हेक्टर आहे. इतकेच नव्हे, तर जिल्ह्यातील ४०५५१.३८ हेक्टरवर नेहमीच वाघांची “मूव्हमेंट’ असते, तसेच जंगलाची सलगता हे बोरचे वैशिष्ट्य असून, वाघांच्या संवर्धनासाठी ते महत्त्वाचे ठरत असले तरी वाघांसाठी पोषक असलेल्या वर्ध्यात प्रथमच “टायगर’ला पिंजराबंद करण्याची वेळ आली आहे. वाघाच्या दहशतीत जगणाऱ्या ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन बोरची राणी अशी ओळख असलेल्या कॅटरिना (बीटीआर-३) ची मुलगी पिंकी (बीटीआर-७) या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांनी दिले आहेत. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत वन विभागाच्या तब्बल नऊ, तर बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाच्या तीन चमू पिंकी नामक वाघिणीला पिंजराबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत; पण हिरवा शालू नेसलेल्या जंगलात पिंकीला पिंजराबंद करण्यासाठी लावलेल्या सापळ्यात ती अद्यापही अडकलेली नसल्याचे वास्तव आहे. ही मोहीम राबविणारे कुठल्याही अडचणीला तोंड द्यावे लागले तरी आम्ही पिंकीला पिंजराबंद करू असा विेशास व्यक्त करीत आहेत, हे विशेष.