दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या आराखड्याला १५ दिवसात मान्यता देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर/प्रतिनिधी दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या सुधारित विकास आराखड्याला पुढील १५ दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलाताई रा. गवई होत्या. केंद्रीय महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावर्षीही तीन दिवसात ३० लाख लक्ष नागरिकांनी दीक्षाभूमी ला भेट दिली. दस-याला पाऊस सुरू असतानाही अनुयायांनी गर्दी केली होती.दीक्षाभूमीच्या विकासासाठी यापूर्वी शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. त्यापैकी ४०कोटी रुपये नागपूर सुधार प्रन्यासकडे जमा असून ६० कोटी रुपये देण्याची राज्य शासनाची तयारी होती. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये पाठपुराव्या अभावी दीक्षाभूमी आराखडा रखडला. आता पुढील पंधरा दिवसात सुधारित १९० कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात येईल, तसेच केंद्र सरकारकडे प्रलंबित तज्ञ बाबींसाठी पाठपुरावा देखील केला जाईल, असे फडणवीस यावेळी म्हणाले. २०२४ मध्ये इंदू मिल येथे अद्यावत स्मारक उभे राहणार असून सी लिंक वरून जाणाऱ्या प्रत्येकाला त्याचे दर्शन घ्यावेच लागेल, अशा पद्धतीची रचना या स्मारकाची करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.बाबासाहेबांनी महिलांना जे अधिकार दिले त्याचा उपयोग समता, बंधुतावर आधारित समाज निर्मितीसाठी करावा, असे आवाहन श्रीमती गवई यांनी केले. विलास गजगाटे यांनी आभार मानले.