अनिल देशमुखांना जामीन मंजूर, तब्बल ११ महिन्यांनंतर उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई/प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना जामीन मंजूर केला आहे. सचिन वाझे याने केलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपाखाली, तसेच मनी लाँड्रिग प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर ईडी आणि सीबीआयने गुन्हा दाखल करत अटक केली होती. त्यानंतर सातत्याने त्यांचा जामीनाचा अर्ज फेटाळला जात होता. आता तब्बल ११ महिन्यांनंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जामीन मिळाला पण लगेच तुरुंगाबाहेर नाही अनिल देशमुख यांना ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये हा जामीन मिळाला असून अजून सीबीआयकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आता सीबीआयकडूनही त्यांना जामीन मिळणार का हे पाहावं लागेल. त्यामुळे अनिल देशमुख यांची लगेचच तुरुंगातून सुटका होणार नाही हे स्पष्ट आहे. त्यांना सध्यातरी आर्थर रोड तुरुंगातच राहावं लागेल.