युवकांनी शासनाच्या उद्योग, व्यवसायासाठी असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी कौशल्य विकास व नाविन्यता सोसायटीच्यावतीने महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा घेतली जात आहे. ही जिल्हास्तरीय स्पर्धा गो.से.महाविद्यालयात घेण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. युवकांनी उद्योग, व्यवसायासाठी असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा, असे यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले. महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये पार पडली. पहिल्या टप्प्यात प्रमुख महाविद्यालयांमध्ये प्रचार, प्रसार व विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभाग करून घेण्यासाठी आवाहन करणे, स्पर्धेचा दुसरा टप्पा महाविद्यालयीन स्तरावर कल्पनांचे सादरीकरण व तिसरा टप्पा जिल्हास्तरावर उत्कृष्ट नवकल्पना निवडणे असा आहे. याच अनुषंगाने महाविद्यालय स्तरावरून सोळा विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेकरिता झाली.

या स्पर्धेचे आयोजन गो.से.वाणिज्य महाविद्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, शिक्षा मंडळाचे अध्यक्ष संजय भार्गव, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक नीता औघड, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य ेशेता कुलकर्णी, गो.से वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर निनावे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थास्तरावरून अंतीम निवड झालेल्या सोळा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी उद्योगासंबंधी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसेच उद्योजकतेकडे विद्यार्थ्यांनी वळावे, असे आवाहन केले. मोठ्या कंपन्या नवकल्पनेशिवाय समोर जाऊ शकत नाही. त्यासाठी नाविन्यता आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिक्षा मंडळाचे अध्यक्ष संजय भार्गव यांनी केले. प्रास्ताविक कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक नीता औघड यांनी केले.

संचलन प्रा.राधा तिवारी यांनी केले तर आभार धीरज मनोहर यांनी मानले. उद्घाटनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. अंतीम निवड झालेल्या सोळा विद्यार्थ्यांनी आपल्या नवकल्पनेचे सादरीकरण परीक्षकांपुढे केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.प्रफुल खोब्रागडे, प्रा.अनुराग लोहारीया, प्रा.करुणा गणवीर, डॉ.धीरज नाईक, प्रा.वसीम रजा, प्रा.पायल घुबडे, प्रा.संदेश जैन, प्रा.राजेश तांडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचे रूपसिंग ठाकूर, अतुल वरेकर, सागर आंबेकर, मुकेश वाघोले, सुवर्णा थेरे तसेच गो.से.वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी यांनी सहकार्य परिश्रम घेतले