६४ तासांनी मत्स्य अधिकाऱ्याचा मृतदेह गवसला

सेलू /प्रतिनिधी बोरधरण येथे खाजगी मत्स्य केंद्राच्या तपासणीकरिता नागपूर येथून आलेल्या अधिकारी व कर्मचार्यांची प्लॅटफार्म उलटला होता. त्यात पाचपैकी चौघं बचावले होते. परंतु, मुंबई मत्स्य विभागात कार्यरत नागपूर येथील युवराज फिरके हे बेपत्ता असल्याने शोध सुरू होता. अखेर मंगळवार २१ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ६४ तासानंतर घटनास्थळीच चिखलात मृतदेह आढळल्याने हा अपघात की घातपात अशी चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यातील बोरधरण येथे धरणात असलेल्या खासगी मत्स्य पालन केंद्रावर मत्स विभागाचे अधिकारी व कर्मचारी तपासणी करण्यासाठी गेले होते.

रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास परत काठावर येण्यासाठी प्लॅटफार्मवर उभे असताना प्लॅटफार्म उलटला. यात चार जण प्लॅटफार्मच्या दोराला पकडून असल्याने ते वाचले तर मत्स्य अधिकारी युवराज फिरके (५२) बेपत्ता होते. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोहणारे तसेच पोलिस विभागाच्या चमूने पाण्यात शोध घेणे सुरू केले. ६४ तासानंतर त्या ठिकाणी ते उभे होते त्याच ठिकाणी धरणातील चिखलात त्यांचा मृतदेह आढळून आला. युवराज फिरके यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती कळताच ते घटनास्थळी पोहोचले होते. युवराज यांचा बुडून मृत्यू झाल्यावर घरच्यांचा विेशासच बसत नव्हता. आज मृतदेह सापडल्यानंतर सेलू पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सेलू ग्रामीण रुग्णालय येथे पाठवला.