सावंगी रुग्णालय आरोग्यसेवेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा जपणारे- नूरुल हसन

वर्धा/प्रतिनिधी सावंगी मेघे रुग्णालय आरोग्यसेवेत अग्रेसर आहेच, पण लोकांशी कौटुंबिक जिव्हाळा जोपासणारीही ही संस्था आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक आरोग्य तपासणीची जबाबदारी मेघे समूहाने घेतली असून त्याची रीतसर सुरूवातही करण्यात आल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी केले. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवात आयोजित ‘आरोग्यम् धनसंपदा’ या ज्ञानविज्ञान जनजागृती प्रदर्शनीच्या उद्घाटन नूरुल हसन यांच्या हस्ते करण्यात आले.

सावंगीच्या शैक्षणिक परिसरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती दत्ता मेघे होते. यावेळी यवतमाळच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितकुमार वाघमारे, पोलीस उपअधीक्षक प्रमोद मकेेशर, संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय गायधने, सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सावंगीत इतक्या मोठ्या लोकसहभागात गणेशोत्सव साजरा होत असताना इथली अंतर्गत सुव्यवस्था उत्तम असल्याबद्दल पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी प्रशंसा केली. यावेळी आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या कौटुंबिक आरोग्य कार्डचे अतिथींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्युदय मेघे यांनी केले. संचालन राकेश अगडे यांनी केले, तर डॉ. महाकाळकर यांनी आभार मानले.

विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित या प्रदर्शनीत दररोज सायंकाळी रक्तदाब, मधुमेह याबाबतच्या तपासण्यांसोबतच दंतविज्ञान, आयुर्वेद, भौतिकोपचार आदी रुग्णालयांद्वारे विविध तपासण्या तसेच वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात येत आहे. याशिवाय, रोबोटिक सर्जरी तंत्रज्ञान व समुपदेशन, मातृदुग्ध पेढीबाबत जागृती, कोहॉर्ट योजना, वार्षिक कौटुंबिक आरोग्य सेवा योजना, नर्सिंग महाविद्यालयाद्वारे पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, भरड धान्य व सकस आहाराबाबत माहिती दिली जाते. दररोज सायंकालीन सत्रात विद्यार्थ्यांद्वारे विविध सामाजिक विषयांवर पथनाट्याचे सादरीकरणही प्रदर्शनी मंडपात करण्यात येते. या आयोजनात भौतिकोपचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इर्शाद कुरेशी, सामुदायिक औषधी विभागाचे डॉ. रावेकर, डॉ. अंजली बोरले, डॉ. श्यामल, डॉ. ऋषिकेश ठाकरे, डॉ. प्रेमकुमार बडवाईक, डॉ. अमित रेचे, डॉ. सीमा सिंग, डॉ. कोमल मुनेेशर, राजेश सव्वालाखे, डॉ. विठ्ठल शिंदे, रितेश डोर्लीकर, अहमिंद्र जैन, सुशांत वानखेडे, डॉ. सामल, डॉ. गोतरकर, माधुरी ढोरे, संदीप कुत्तरमारे, रुपेश पांडे, अभिजित वानखेडे, अजय केवलिया, मीनाक्षी चौधरी, लीना पाहुणे, रौनक मिश्रा, अभिजित राऊत तसेच संस्थांतर्गत कार्यरत विविध समन्वयकांचे सहकार्य लाभले आहे.