मान्सून रखडला, पेरण्या खोळंबल्या…. राज्यात अनेक ठिकाणी पेरण्याच नाहीत

मुंबई/प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात अद्यापही मान्सूनचं आगमन न झाल्याने पिकांची काम रखडले आहे. सोबतच विदर्भात अजुनही उष्णतेची लाट बघायला मिळत आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनण्याची भीती आहे. मान्सूनचा प्रवास पुढे सरकत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडत चालली आहे. मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आल्याचं चित्र आहे. बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला असून खरीपाच्या पेरण्या देखील झालेल्या नाहीत. धूळवाफ पेरण्या झालेल्या ठिकाणी आता पुन्हा एकदा दुबार पेरणीचे सावट निर्माणझाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

राज्यात दरवर्षी जवळापास १५० लाख हेक्टरवर पेरण्या होतात. यंदा मात्र पावसाचा १८ जूनपर्यंत १ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी धूळवाफ पेरण्या झाल्या आहेत, मात्र पावसाअभावी त्यात देखील अडचणीत आल्या आल्याचं दिसून येतंय. पाऊस अधिक लांबल्यास कडधान्याच्या पेरणी क्षेत्रात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरवर्षी तळकोकणात पाऊसाची सुरुवात चांगली होते, पण यंदा तळकोकणातही पाऊस हवा तसा अद्यापही सक्रिय नाही. राज्यात २३ जुलैनंतरच चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढेपर्यंत पेरण्या देखील होणार नाहीत राज्यातील धरण साठ्याबद्दल बोलायचं तर ता े देखील आटत चाललेला आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मध्य महाराष्ट्रआणि मराठवाड्यात गंभीर स्थिती आहे. उपमुख्यमंत्र्यांकडून आज पाटबंधारे महामंडळांचा आढावा घेण्यात आला आहे. यंदा हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार सरासरी पाऊस झाल्यास सिंचनासाठी देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. विदर्भात कपाशी, सोयाबीन,भुईमूगसारखी पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. साधारण जूनच्यादुसऱ्या आठवड्यात पेरणीला सुरुवातहोत असते. मात्र, अद्यापही पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. विदर्भातअजूनही उष्णतेची लाट बघायला मिळतआहे. अशात पाण्याची सोय असलेल्याशेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्यांवर संकट ओढवलेलं आहे.

विदर्भ : काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला, अशात काही ठिकाणी पेरण्या झाल्या. मात्र, त्याचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. नागपूर आणि अमरावती विभाग मिळून ५० लाख हेक्टरची लागवड खरीपमध्ये होते. मात्र, फक्त आतापर्यंत तीन ते चार टक्के लागवड झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सोबतच अधिक तापमानामुळे झालेल्या पेरण्यांवर देखील परिणाम होत उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र : पश्चिम महाराष्ट्रात अद्याप पेरण्यांना सुरुवात देखील झालेली नाही. वळीव पाऊसही न झाल्यामुळे उन्हाळी मशागतीही रखडल्या. कृष्णा, कोयना, पंचगंगा नद्यांची पाणी पातळी खालावल्यामुळे पिण्याच्या पाण्याची प्रश्न निर्माण झाल्याचं चित्र आहे.

मराठवाडा : अर्ध्याहून अधिक जून लोटला तरी पेरण्यांना सुरुवात नाही. मोठा पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करु नयेत असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय. धरणांमधला पाणीसाठा देखील जेमतेम असल्याने कपातीची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र : पावसाअभावी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात खरिपाची पेरणी रखडली आहे. ७५ मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जळगाव जिल्ह्यात ज्यांच्याकडेपाण्याची उपलब्धता आहे, त्यांचीबागायती कपाशीची पेरणी सुरू आहे.धुळे आणि नंदुरबारमध्येही चांगल्या पावसाअभावी पेरण्या लांबल्या आहेत. राज्यात कडधान्य मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. त्यामुळे अपेक्षित पाऊस न झाल्यास पेरण्यांना उशिरा होतील आणि त्यातपाऊस कमी झाल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची भीती आहे. त्यामुळे तसं झाल्यास कडधान्याचे भाव कडाडण्याची भीती आहे. एकीकडे धरणांमधील पाणीसाठा तळ गाठतोय. दुसरीकडे मान्सूननं अद्यापही संपूर्ण महाराष्ट्र व्यापला नाही. अशात शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे.