दत्तपूर टी पॉईंट ते शहरापर्यंत एक हजार वृक्ष लावा

वर्धा/प्रतिनिधी दत्तपूर टी पॉईंट ते वर्धा शहरापर्यंत १ हजार वृक्ष लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत. रविवार १८ रोजी शहरातील स्वयंसेवी संस्था व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरालगतच्या डेरेदार वृक्षांच्या बुंध्यापर्यंत लावण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक काढण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. नागपूर रस्ता रुंदीकरण करतेवेळी धुनिवाले चौक ते दत्तपूर टी पॉईंटपर्यंत रस्त्यालगत असलेल्या ५० ते ६० वर्षाचे डेरेदार वृक्षांच्या बुंध्यापर्यंत सिमेंट काँक्रीट व पेव्हिंग ब्लॉक लावण्यात आले आहेत. त्यामुळे ते वृक्ष मरनासन्न अवस्थेत असल्याचे वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांच्या निदर्शनास आले. डॉ. पावडे यांनी ही बाब जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या लक्षात आणून दिली.

जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पेव्हिंग ब्लॉक काढण्याच्या सूचना दिल्या. सा. बां. विभागाने कामाला सुरूवात केली. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण व्हावे तसेच यापुढे रस्त्यालगत असलेल्या वृक्षांच्या बुंध्यापर्यंत काँक्रीट व ब्लॉक लावण्यात येऊ नये, याबाबतची जनजागृती होण्याकरिता वैद्यकीय जनजागृती मंचने पेव्हिंग ब्लॉक काढण्याकरिता शहरातील सर्व स्वयंसेवी संस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज हे पेव्हिंग ब्लॉक काढण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अभियंता राजेंद्र आचार्य, शाखा अभियंता अभय शिंगाडे यांच्या उपस्थितीत वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, सदस्य प्रभाकर राऊत, अरविंद सरदार, प्रकाश अग्रवाल, माणिक झाडे, अरविंद लोहे, श्याम भेंडे, गणेश खडगी, डॉ. भूषण पाटील, मोहन मिसाळ, पुंडलिक बेसेकर, प्रकाश चांदेकर, सचिन गरपाळ, महेश अडसुळे, मंगेश दिवटे, लोभेष बोंडे, सतीश जगताप, अजय ठाकरे, सुनील महाजन आदींनी दत्तपूर टी पॉईंट ते कुष्ठधामपर्यंत पेव्हिंग ब्लॉक काढून वृक्षांना जीवदान दिले.