स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या वारसाची भूखंडाच्या नोंदीसाठी पायपीट

वर्धा/प्रतिनिधी अप्पर वर्धा धरणाच्या बुडीत क्षेत्रात वडाळा येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. वसंत नागपुरे यांच्या मालकीची जमीन आणि घर गेल्यानंतर शासकीय नियमानुसार मिळालेल्या भूखंडाची अद्यापही नोंद केली नाही. याकरिता त्यांचा वारस शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. भूखंडाची नोंद करण्यात यावी, अशी मागणी अरूण नागपुरे यांनी जिल्हाधिकारी कर्डिले यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यावर कारवाई न झाल्यास १५ मे पासून उपोषण सुरू करणार असल्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे. दरम्यान, आ. डॉ. रामदास आंबटकर २ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कामानिमित्त बसुन असलेल्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणल्या असता स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या वारसालाही त्रास सहन करावा लागत असल्याचे लक्षात आले. त्यांनी उपविभागीय अधिकार्यांकडे जाऊ या प्रकरणात तोडगा काढला.

अरूण नागपुरे यांचे आजोबा स्व. वसंत नागपुरे यांचे वडाळा येथे स्वःमालकीचे घर व शेत होते. ही मालमत्ता अप्पर वर्धा धरणाचे बुडीत क्षेत्रात गेल्याने चिस्तुर येथे भू. क्रं. १३७/४ अन्वये ०.८१ हे. आर एवढी लेव्हीची शेतजमीन त्यांना मिळाली. शिवाय घराचा मोबदला पुनर्वसन विभागाकडून मिळाला आहे. परंतु, वडाळा येथे भूखंड क्रमांक ७९ देतेवेळी आजोबाचे मोठे भाऊ दत्तू नागपुरे यांच्या नावाचीच नोंद करण्यात आली. लहान आजोबा स्व. वसंत नागपुरे यांच्या नावाची नोंद त्यामध्ये केली नाही. प्रशासनाने केलेल्या तांत्रिक चुकीबाबतस्व. वसंत नागपुरे यांनी तत्कालीन पुनर्वसनअधिकारी ब्राम्हणकर यांच्याशी संपर्कहीसाधला होता. त्यांनी नोंद केली असल्याचे सांगितले. परंतु, अद्याप वसंत नागपुरे यांचे नावाने भुखंडाची नोंद करण्यात आली नाही. याबाबत अरूण नागपुरे यांनी संबंधित कार्यालयाशी वारंवार पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांना कार्यालयाकडून टोलवाटोलवीची उत्तरं मिळाले.

वडाळा येथे भूखंड क्रमांक ७९ सद्यःस्थितीत शिल्लक असूनसुद्धा त्यामध्ये त्यांच्या नावाची नोंद केली नाही. वडाळा येथील भूखंड क्रमांक ७९ मध्ये त्यांच्या नावाने सुधारित नोंद करण्यात यावी, अशी मागणी अरुण नागपुरे यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून केली असून तसे न झाल्यास १५ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. दरम्यान आ. आंबटकर यांनी त्यात हस्तक्षेप करून उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी येत्या १० दिवसात ८ वर्षातील प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आ. डॉ. आंबटकर यांनी दिली.