रस्ते खड्ड्यांचे; सिग्नल, पाकर्ींग नाही अन् फक्त हेल्मेट सक्तीच?

वर्धा/प्रतिनिधी वर्धेतील राजकारणाने शहराची पार वाट लावली. आजही नगर पालिका अस्तित्वहिन असल्यागत वागत आहे. कोणाचा पायपोस कोणात नाही. सध्या निवडणुका नसल्याने राजकारण्यांना शहरात डोकं घालायला फुरसद नाही. पण, पुढच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू झाली असताना वर्धेत मात्र महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हेल्मेट सक्तीचे बुजगावने उभे होणार आहे. त्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने पुरेसी तयारीही केली आहे. परंतु, पुरेश्या सुविधेअभावी! वर्धा शहराचा जीव केवढा हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. दादाजी धुनिवाले चौकापासुन सुरू झालेले वर्धा बजाज चौकात संपते आणि स्नेहलनगर ते लेप्रसी फाऊंडेशन असा वर्धेचा आवाका आहे. रस्ते म्हटले तर दोनच! एक बॅचलर आणि दुसरा बजाज ते शिवाजी चौक! चौकाचौकात दुकानं असले तरी बाजारपेठ मात्र एकच आहे. एकंदरीत वर्धा शहर चार किमीच्या बाहेर नाही.

अमृत योजनेतील भुमिगत गटारच्या कामाने शहर बकाल करून टाकले आहे. ब्रिटीशांच्या काळात असलेल्या वर्धा शहराच्या नियोजनाचा रस्त्यापर्यंत दुचाक्या उभ्या असतात. साधे सराफा बाजारातही कार घेऊन जाता येत नाही. एक फर्लांगवर चार चाकी उभ्या कराव्या लागतात. पोलिसांचा तिसरा डोळा शहरातील काहीच चौकात उघडा आहे बाकी भोकणाच! वाहतूक नियंत्रण करण्याची जबाबदारी पोलिस विभागाच्या वाहतूक नियंत्रण विभागाची असली तरी सिग्नल सुरू करण्याचीसाठी नगर पालिकेकडे बोट दाखवले जाते. सायंकाळी बजाज बालमंदिरकडून रामनगरकडे जाणेही अवघड होते अशी चौपाटी तयार झाली आहे. नाश्ता करणारेही रस्त्यापर्यंत स्टूल मांडून बसलेले असतात,

ही शहराची वास्तव परिस्थिती असुन चार किमीच्या अंतरात वाहन चालक कितीदा हेल्मेट घालेल आणि कितीचा काढेल असा प्रश्न तत्कालीन वाहतूक पोलिस निरीक्षक गुरव यांनाही विचारण्यात आला होता आणि आजही तोच प्रश्न विचाल्या जात आहे. अपघात टाळण्यासाठी हेल्मेट सक्ती जरी आवश्यक असली तरी शहरातील सुविधांकडेही दुर्लक्ष करून चालणार नसल्याने आधी सुविधा द्या नंतरच सक्ती करा! ज्यांना आपल्या जीवाची भीती आहे ते हेल्मेट वापरत आहेत त्यांचे कौतुक करा…