सेवाग्रामात पर्यटकांना दिलासा, आश्रम प्रतिष्ठानने वेळ वाढविला

सेवाग्राम/प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आश्रम प्रतिष्ठानने सुरक्षा व तांत्रिक अडचणींमुळे १ जानेवारी २०२१ रोजी आश्रमाची वेळ सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केली होती. मात्र, आता ही वेळ ४५ मिनिटांनी वाढविण्यात आली आहे. मंगळवारपासून सकाळी आठ ते सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत पर्यटकांना आश्रमात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींचा आश्रम हा जगात प्रसिद्ध आहे. ही गांधीजींची कर्मभूमी राहिली असून स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. आश्रम नियमांवर आधारित आणि सार्वजनिक राहिल्याने याला एक वेगळे महत्त्व आहे. श्रमदान, सूतकताई, रचनात्मक कार्य, प्रार्थना हा आश्रमाचा पाया आहे. प्रार्थना प्रात:वेळी आणि सायंकाळी होत असून सायंकाळची प्रार्थना मात्र निळ्या आभाळाखाली होते.

गांधीजींनी आपल्या जीवनात प्रार्थनेला खूप महत्त्व दिलेले होते. देश- विदेशातील पर्यटक, दर्शनार्थी आणि अभ्यासक तसेच अति महत्त्वाच्या व्यक्ती येथे भेट देण्यासाठी येतात. वास्तविकत: जुनी वेळ ही सूर्यो दय ते सूर्यास्त अशी होती. उशिरा येणाऱ्या लोकांना प्रवेशद्वार बंद झाल्याचे पाहून परत जावे लागायचे. वेळ वाढविला तर बरे होईल, असा विचार पुढे आला आणि मंगळवारी यावर शिक्कामोर्तब झाले. फलकांवर तसा बदलही करण्यात आला असून वाढीव वेळेचा पर्यटकांनाही फायदा होत आहे.

वर्षभरात सव्वादोन लाख पर्यटकांची भेट

सेवाग्राम आश्रमात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात दोन लाख २६ हजार ३५५ दर्शनार्थींनी भेटी दिलेल्या आहेत.वास्तविक यापेक्षाही जास्त पर्यटक येऊन गेले असून त्यांनी नोंदी केलेल्या नाहीत. अनेक पर्यटक येतात; पण नोंदी न करताच निघून जातात. आश्रमाला गांधीजींच्या नात सुमित्रा गांधी- कुळकर्णी, उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, खासदार शशी थरूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फिजीचे राष्ट्रदूत कमलेश स्वरूप इत्यादींनी भेटी दिलेल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक लोक उशिरा येतात. वेळ संपल्याने त्यांना परत जावे लागत असल्याने वेळ वाढवून दिलेला आहे. दर्शनार्थींनी वेळेचे भान ठेवून सहकार्य करावे. – आशा बोथरा, अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान आश्रम प्रतिष्ठानच्या वतीन े व ेळ वाढविण्यात आल्याने येणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधाजनक झालेले आहे. सध्या उन्हामुळे सकाळी आणि सायंकाळी पर्यटक आश्रमाला भेट देऊ शकतात. – जयश्री पंडित, पर्यटक, बंगळुरू