पहेलानपूरात वादळी पावसाचे थैमान

सिंदी रेल्वे/प्रतिनिधी गुरुवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हमदापूर सर्कलमध्ये थैमान घातले. पहलानपूर शिवारात भव्य चिंचेचे झाड अमोल टमगिरे यांच्या बोलेरो चारचाकी वाहनावर कोसळले.डी.पी.चे सुध्दा मोठे नुकसान झाले.चार तास वाहतूक ठप्प होती.वीज पुरवठा नसल्यामुळे गावकऱ्यांनी अंधारात रात्र काढली,अशी माहिती ग्रा. पं.सदस्य अरुणा टमगिरे यांनी दिली आहे. या भागात गुरुवारी आठवडी बाजार संपण्याची लगबग असतांनाच सायंकाळी साडे सहा वाजता अचानक ढग जमले आणि वादळी पावसाला सुरुवात झाली. अवघ्या पंधरा मिनिटा ंत पहलानपूर ,चिंचोली, हमदापूर गावांत वादळात अनेक घरांची छप्पर उडालीत. पहलानपूर निवासी अमोल टमगिरे यांच्या बोलेरो गाडीवर चिंचचे झाड कोसळले.त्या भव्य झाडाची फांदी समीपच्या डीपीवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. अमोलच्या वाहनाचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. हमदापूर सर्कलमधील आठ दहा गावावर ही नैसर्गिक आपत्ती ओढवली असून १५० एकरातील कडाळू (हिरवा चारा) भूईसपाट झाला.प्रमोद चौधरींच्या गोठ्याचे नुकसान झाले.या आपत्तीजनक स्थितीमुळे सिंदी ते हमदापूर मार्ग चार तास बंद होता.त्या भागात रात्रभर वीज वितरण बंद होते.प्रशासनाने जनतेला त्वरित नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी पहलानपूर ग्रा.पं.सदस्य अरुणा टमगिरे यांनी केली आहे.