भारतीयांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे संविधान होय- डॉ. बुटले

वर्धा/प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना कोणत्याही एका समाजापुरती मर्यादित नसून संपूर्ण भारतीयांसाठी आहे. विविध राष्ट्रांच्या राज्यघटनांचे दीर्घकाळ अध्ययन आणि चिंतन करून प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता देणारे सर्वोत्तम संविधान डॉ. आंबेडकरांनी परिश्रमपूर्वक निमार्ण केले. म्हण ूनच सवर् धर्मग्रंथाहून सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान होय, असे उद्गार ज्येष्ठ विचारक डॉ. सिद्धार्थ बुटले यांनी ‘भारतीय संविधान आणि बहुजन समाजासमोरील आव्हाने’ या विषयावर बोलताना काढले. दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघाद्वारे भीमजयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या हिप्पोक्रेट्स सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिमत विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर होते. यावेळी, डॉ. उल्हास दुधेकर, जयंती उत्सवाचे संयोजक डॉ. अमोल लोहकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तथागत गौतम बुद्धापासून संत कबीर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, संत गाडगेबाबा या लोकपरंपरेशी बाबासाहेबांचे असलेले नाते बहुजन समाजाने समजून घेतले पाहिजे.

संविधान आपल्या हक्कांची, मानवी मूल्यांची जपणूक करण्यासाठी असून याला छेद देण्याचा प्रयत्न होत असेल तर या देशाचे जागरूक नागरिक म्हणून आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात संजय इंगळे तिगावकर यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या विचारांचे अनुसरण करणारे अनुयायी हवे आहेत, भक्त नकोत, असे उद्गार डॉ. दुधेकार यांनी काढले. तर प्रास्ताविकात डॉ. अमोल लोहकरे यांनी भारतीय संविधान आपल्या देशाची एकात्मता टिकवण्यासाठी अत्यंत मोलाचे असून संविधानाचे संवर्धन करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे मत मांडले. यावेळी किरण कांबळे, सुजाता तोतडे, संजया नगराळे, विजय गोटे यांनी बाबासाहेबांच्या कार्याबद्दल उत्स्फूर्तपणे आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे संचालन माधुरी मेश्राम यांनी केले तर आभार जितेन्द्र आगलावे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता चंदा पाटील यांच्या स्वरचित भीमगीताने करण्यात आली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जयंती उत्सवानिमित्त प्रारंभी सावंगी रुग्णालयाच्या प्रांगणात अतिथींच्या हस्ते महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे अनावरण व लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित भारतीय संविधान या विषयावरील रांगोळी स्पर्धेत कर्मचारी वृंदाने सहभागी होत उत्कृष्ट रेखाटन केले. तसेच शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटर येथे लावण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी किशोर पोपटकर, श्रावण पोपटकर, राजू ताकसांडे, संगीता कांबळे, सुजाता जीवने, चंदा पाटील, अंकुश स्वामी आणि कर्मचारी संघाच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.