भारतात पुन्हा वाढला कोरोनाचा धोका

नवी दिल्ली/प्रतिनिधी कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वेगानं वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५,३३५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिल्लीतील पॉझिटिव्हीटीचा दर २५ टक्क्यांच्या पलिकडे गेला आहे. दिल्लीत एका दिवसात ५०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आता दिल्लीचा पॉझिटिव्हीटी रेट २६.५४ टक्के इतका झाला आहे. जो गेल्या १५ महिन्यातील सर्वो च्च दर आहे. कोरोनाचा धोका वाढत असूनही लोक अजूनही मास्क वापरण्याबाबत सजग झालेले दिसत नाहीत.
याच मुद्द्यावरुन आरोग्य तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. बहुतांश लोक सार्वजनिक ठिकाणी, बाजार, उद्यानं आणि सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी अजूनही मास्कविना फिरताना दिसतात. अशीच परिस्थिती जर सुरू राहिली तर व्हायरस म्यूटेड होऊन गंभीर संक्रमणाचं संकट पुन्हा निर्माण होईल. दिल्लीतील वाढता कोरोना लक्षात घेता सरकारनं रुग्णालयात मास्क वापरणं अनिवार्य केलं आहे. पण सार्वजनिक ठिकाणी अजूनही नियमांमध्ये शिथीलता पाहायला मिळत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. तसंच कोरोना संबंधित सर्व गाइडलाइन्सचं पालन करण्यास सांगितलं आहे.
नव्या कोरोनाची लक्षणं नेमकी काय?
XBB 1.16 व्हेरिअंटची सामान्य लक्षणांमध्ये श्वसना संदर्भातील आजार, डोकेदुखी, घशात खवखव, नाक बंद होणं, ताप आणि मांसपेशी दुखणे यांचा समावेश आहे. या व्हायरसच्या संक्रमणामुळे पचन संस्थेवरही परिणाम होऊ शकतो. यामुळे लागण झाल ेल्या व्यक्तीला डायरियाची समस्या उद्भवते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आणि नियमीत स्वरुपात हात स्वच्छ धुणे यासोबतच कोरोना लसीकरण देखील अत्यंत गरजेचं आहे. ज्यांनी अजूनही कोरोना लसीकरणाचा तिसरा डोस घेतलेला नाही अशांना तिसरा डोस लवकरात लवकर घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जे आधीपासूनच इतर सहव्याधींनी ग्रासले आहेत अशा व्यक्तींर्नी जास्त काळजी घ्यावी.