सिक्कीमच्या नाथू ला सीमेलगत हिमस्खलन; ७ जणांचा मृत्यू, २२ पर्यटकांची सुखरुप सुटका

सिक्कीम/प्रतिनिधी सिक्कीममधील नाथू ला सीमावर्ती भागात मंगळवारी (४ एप्रिल) भयंकर हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, ११ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. भारतीय लष्कराने आणि मदत-बचाव पथकाने २२ जणांची सुटका केली आहे. या हिमस्खलनात जवळपास ८० पर्यटक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या हिमस्खलनानंतर गंगटोकला नाथू ला याला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू मार्गावर बचाव कार्य सुरू आहे. हिमस्खलनात अडकलेल्या २२ जणांची सुटका करण्यात आली. त्यांना गंगटोक येथील एसटीएनएमरुग्णालय आणि सेंट्रल रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रस्त्यावरून बर्फ हटवल्यानंतर जवळपास ३५० पर्यटक आणि ८० वाहनांची सुटका करण्यात आली.
पर्यटकांनी परवानगी घेतली नाही?
चेकपोस्टचे महानिरीक्षक सोनम तेनजिंग भूतीया यांनी सांगितले की, १३ वे मैल साठीच पास दिले जातात. मात्र, पर्यटक कोणत्याही परवानगीशिवाय १५ व्या मैलकडे गेले होते. सध्या सिक्कीम पोलीस, सिक्कीममधील ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन, पर्यटन विभागाचे अधिकारी, वाहन चालक यांच्या साहाय्याने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.