रामनवमीच्या दिवशी गुजरातमध्ये हिंसा, वडोदरा येथे शोभायात्रेवर दगडफेक

वडोदरा/प्रतिनिधी ऐन रामनवमीच्या दिवशी गुजरातमध्ये हिंसा भडकली होती. वडोदरा शहरात आयोजित शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर शहरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी तातडीने ॲक्शन घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आज रामनवमीनिमित्त वडोदरा शहरातून शोभायात्रा निघाली होती. फतेपुरा गराना पोलिस चौकीजवळ अचानक शोभायात्रेवर दगडफेक सुरु झाली. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर दगडं फेकू लागले. घटनास्थळी पोलिस पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिस सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींचा शोध घेत आहेत.
सध्या घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात आहे. डीसीपी यशपाल जागानिया यांनी सांगितलं की, रामनवमी शोभायात्रेदरम्यान एका मशिदीसमोर परिस्थिती बिघडली होती. परंतु सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेमध्ये कुणीही जखमी नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेनंतरही शोभायात्रा पुढे निघाली. कुठलीही तोडफोड येथे झाली नाही. पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती चिघळली नाही.