हाथरस बलात्कार प्रकरणी चारही आरोपी निर्दोष

हाथरस/प्रतिनिधी हाथरस सामूहिक बलात्कार कांडाप्रकरणी गुरुवारी आज कोर्टाने चारही आरोपींना बलात्काराच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले आहे. त्यापैकी एक आरोपी संदीप ठाकूर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तर लवकूश सिंह, रामू सिंह व रवी सिंह या ३ आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. चार आरोपींपैकी एकाही आरोपीवर सामुहिक बलात्काराचा आरोप सिद्ध झाला नाही. त्यामुळे पीडित पक्षाच्या वकिल या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. गुरुवारी सकाळी चारही आरोपींना पेशीसाठी कोर्टात आणले गेले होते. त्यावेळी न्यायालयाने संदीपला सदोष मनुष्यवध (कलम ३०४) व एससी/एसटी कायद्यांतर्गत दोषी ठरवले आहे. संदीपला आजच शिक्षा सुनावली जाईल. १४ सप्टेंबर २०२० रोजी हातरसच्या चांदपा क्षेत्रातील एका गावात एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची बाब उजेडात आली होती.
गावातीलच ४ तरुणांवर हा आरोप करण्यात आला होता. पीडितेची जीभ अत्यंत निर्दयीपणे कापण्यात आली होती. मुलीच्या भावाने गावातीलच संदीप ठाकूरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुलीच्या जबाबाच्या आधारावर २६ सप्टेंबर रोजी लवकुश सिंह, रामू सिंह व रवी सिंह या तिघांनाही आरोपी करण्यात आले होते. चारही आरोपींना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले होते. तरुणीला गंभीर स्थितीत बागला जिल्हा संयुक्त रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला अलीगडच्या जे एन वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. पण प्रकृती बिघडल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आले. तिथे २९ सप्टेंबर रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर रातोरात कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले होते.