तळमळीतूनच साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वर्धा/प्रतिनिधी जगण्याचे बळ देणारे साहित्यिक हे मुळात सामाजिक नेते असतात. जगण्याच्या तळमळीतून साहित्य आणि राजकीय नेतृत्व निर्माण होते. समाजाला दिशा देणाऱ्या या दोन्हींचे उगमस्थान साहित्यच आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाचा व सूचनांचा राज्य शासन कायम आदर करीत आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त येथील आचार्य विनोबा भावे सभामंडपात प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर आयोजित या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.

संमेलनाध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर, शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, पूर्वाध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. विेशनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विेशास आणि डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष तथा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते आदि उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे. हे दोन्ही महान नेते एक उत्तम लेखक होते.

या प्रभावळीत लोकमान्य टिळक, महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आदी राजकीय नेते हे उत्तम लेखक होते. लोकसेवेचे व्रत घेवून या सर्व नेत्यांनी साहित्यातूनच आपल्या सामाजिक व राजकीय कार्याची मोट बांधल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले. राजकीय नेतृत्वाचे उगमस्थान साहित्य असल्याचे यातून अधोरेखित होते, त्यामुळे लोकसेवेच्या व्रताला बळ देण्यासाठी साहित्यिकांकडून राज्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.