वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनादरम्यान आंदोलन

वर्धा/प्रतिनिधी ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला एकदा, दोनदा, नव्हे तर तीनदा गोंधळ उडाला. वेगळ्या विदर्भ आणि शेतकर्यांच्या आत्महत्येच्या आक्रोशाने मुख्य सभागृह दणाणले. ऐन मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सुरूवात झाली असतानाच अगदी पुढयातल्या काही रांगामध्ये बसलेल्या एका व्यक्तीने वेगळ्या विदर्भासाठी घोषणाबाजी केली आणि नागपूर कराराची पत्र फाडून फेकली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत नाही तोच आखणी काहींनी सभागृह डोक्यावर घेतले. प्रचंड लांबलेल्या या उद्घाटन सत्राच्या शेवटीही असाच काहीसा विरोध दर्शवला गेला. या सार्या गोंधळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणाचा सूरच गवसला नाही. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी पार पडलेले उद्घाटन सत्र मुळातच काही तास उशिरा सुरू झाले. त्यात ते बरेच लांबले. सर्वांचे लक्ष लागले होते ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाकडे, पण त्यांचे भाषण एका अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला साजेशे असे झालेच नाही. त्याला कारण अगदी नमनालाच झालेला गोंधळ असू शकेल.

पण मुख्यमंत्र्यांच्या २९ मिनिटांच्या भाषणात एक-दोन घोषणा तेवढ्या सोडल्या तर दुसरे तिसरे काहीच नव्हते. साहित्यात राजकारण आडवे येणार नाही, असा त्यांनी दोनदा उच्चार केला. त्यांना या संमेलनात सुद्दढ सांस्कृतिक लोकशाहीचे विराट रूप दिसले, हे त्यातल्या त्यात उल्लेखनीय म्हणता येईल. मुळात वेगळा विदर्भ आणि शेतकर्यांच्या आत्महत्येचा विषय पुढे रेटला तो शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी. बरेच कार्यकर्ते मुख्य सभागृहातील अति महत्त्वाच्या व्यक्तींर्च्या बसण्याच्या ठिकाणी बसून होते. उद्घाटन सुरू होण्याच्या आधी समोरच्या खूर्च्या रिकाम्या होत्या, तेव्हा मंचावरूनच पोलिसांना आवाहन करण्यात आले की जे लोकं येत आहेत, त्यांना समोर पाठवा. कदाचित हीच संधी साधत हे कार्यकर्ते अगदी पुढे येऊन बसले आणि मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे तो अधिक प्रकर्षाने सर्वांसमोर आला.