शेतीचा लागत खर्च कमी करुन जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे- रोहन घुगे

वर्धा/प्रतिनिधी जिल्हा परिषद कृषि विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान, मुख्य पिकावरील व्यवस्थापन, किड व रोग नियंत्रण, पिक संरक्षण, शेतकरी उत्पादक गट याबाबत मार्गदर्शनसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना शेतीचा लागत खर्च कमी करुन जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले. जिपच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी श्री.घुगे यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.विद्या मानकर उपस्थित होते. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती व नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा. ज्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतीमध्ये नवीन प्रयोग करुन जास्त उत्पन्न घेतले अशा शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन सीईओ घुगे यांनी पुढे बोलतांना केले. प्रास्ताविक कृषि विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण यांनी केले. जिपच्या कृषि विभागामार्फत राबविण्यांत येणा-या वैयक्तिक लाभाच्या व इतर योजनांची माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन उत्पन्नामध्ये वाढ करुन आपली आर्थिक स्थिती उंचावावी, असे श्री.गोहाड यांनी सांगितले.

डॉ.मानकर यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा पुढील खरीप हंगामामध्ये वापर करुन पिकाची लागवड करावी, असे आवाहन केले. केव्हीके सेलसुराचे कृषि शास्त्रज्ञ डॉ.रुपेश झाडोदे यांनी मुख्य पिकांचे व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती दिली. डॉ.निलेश वजीरे यांनी पिकावरील कीड व रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. बजाज फाऊंडेशनचे समन्वयक प्रताप मंगरुळकर यांनी शेतकरी उत्पादक गट, मोहिम अधिकारी संजय बमनोटे, यांनी कृषि निविष्ठा खरेदी करतांना व किटकनाशक फवारतांना घ्यावयाच्या दक्षतेबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेवून उत्पन्नामध्ये भरीव वाढ करणाऱ्या राजहंस विठोबा चौधरी (ऐदलाबाद ता.समुद्रपूर), निरंजनाबाई धनवीज (आजनगाव, ता.हिंगणघाट), रमाबाई ब्रम्हदेव लोखंडे (सोनेगाव बाई ता.देवळी), अर्चना विजय सिराम (फेपरवाडा ता.कारंजा) तसेच प्रगतीशिल शेतकरी अविनाश बबनराव कहाते (रोहणा ता.आर्वी), संजय भानुदास घुमडे (रेहकी ता.सेलू), सुखदेव नामदेवराव बालपांडे (तारासावंगा ता.आष्टी), मनोज पोकळे (सुकळी बाई ता.सेलू), भारत किसनाजी भोंगाडे (महाकाळ ता.वर्धा), वैभव चंद्रकांत उघडे (उमरी मेघे) यांना श्री.घुगे यांच्याहस्ते सन्मानित करण्यांत आले. कार्यशाळेला जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन संजय बमनोटे यांनी केले तर आभार कृषि अधिकारी मनोज नागपुरकर यांनी केले.