पालकमंत्री देवेंद्र फडणवीस करणार ध्वजारोहण

राकेश चौधरी – नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते २६ जानेवारी रोजी कस्तुरचंद पार्क येथे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. आज या संदर्भात विभागीय आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. कस्तुरचंद पार्क येथे २६ जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक पार पडली. विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या पोर्शभूमीवर या आयोजनादरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी प्रशासनाला दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या बैठकीस आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभागासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

२३ जानेवारी पर्यंत कस्तुरचंद पार्क येथे पोलीस विभाग व शालेय शिक्षण विभागाच्यावतीने विविध कार्यक्रमाचा सराव तर २४ जानेवारीला मुख्य कार्यक्रमाची रंगीत तालीम होणार आहे, याबाबत विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला व आवश्यक सूचना दिल्या. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पोर्शभूमीवर नागपूरसह विभागातील अन्य पाच जिल्ह्यांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या आयोजना दरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशा सूचनाही डॉ. बिदरी यांनी दिल्या. उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण होणार आहे. या कालावधीत कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात येऊ नये, असे आदेश आयुक्तांनी या बैठकीत दिले. अन्य शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी ८.३० वाजता किंवा सकाळी १०.०० वाजेनंतर ध्वजारोहण करता येणार आहे. सर्व कार्यालयांनी याची नोंद घेण्याची सूचना त्यांनी केली. प्रजासत्ताकदिनी नागपूर विभागातील सर्व शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात यावी, अशी सूचनाही आयुक्तांनी दिली.

प्रजासत्ताक दिनी ऐतिहासिक सिताबर्डी किल्ल्यावरही ध्वजारोहण करण्यात येणार आहे व सर्वसामान्यांसाठी हा किल्ला सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत खुला राहणार आहे. याशिवाय प्रजासत्ताकदिनाचे सुसूत्र पध्दतीने आयोजन होण्यासाठी संबंधित विभागांना आयुक्तांनी यावेळी आवश्यक निर्देश दिले. २६ जानेवारीच्या कस्तुरचंद पार्क वरील कार्यक्रमासाठी सामान्य नागरिकांनाही उपस्थित राहता येणार आहे. याशिवाय या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक ,त्यांचा परिवारातील सदस्य, सैन्य दलातील अधिकारी त्यांच्या परिवारातील सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी या कार्यक्रमाचे समाज माध्यमांवर प्रसारण केले जाणार आहे त्याची लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. २६ जानेवारीला सायंकाळी स्थानिक वसंतराव देशपांडे सभागृहात शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून या देशभक्तीपर कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी केले आहे.