दत्तपूर आरती चौक जोड रस्त्यांसाठी टाळाटाळ

वर्धा/प्रतिनिधी पाच वर्षांपासून सुरू असलेला विकास गेल्या काही महिन्यांपासून ढेपाळलेला आहे. दत्तपूर ते आरती चौक पुढे सेवाग्राम या रस्त्याच्या गुणवत्तेविषयी प्रश्न चिन्ह असताना ठेकेदाराने जोड रस्ते तयार करून देण्यासाठी हातवर केले आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्याच्या कामाची तारीफ करताना थकत नसल्याने ठेकेदाराला पाठबळ तर मिळत नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. जोड रस्त्याचे काम बंद असल्याने नालवाडी, साटोडा परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दत्तपूर ते आरती टॉकीज चौकदरम्यान सिमेंट-काँक्रीट रस्त्याचे काम एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले. मात्र, हे करीत असताना कंपनीने नालवाडी, आलोडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक ॲप्रोच रस्ते अर्धवट सिमेंटीकरण, डांबरीकरण करून सोडून दिले आहे. त्यामुळे मुख्य सिमेंट रस्ता ते आतमध्ये जाणारा रस्त्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी उंच नाल्या बांधण्यात आल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान होत आहे.

याबाबत कंपनीच्या अधिकार्यांकडे लेखी तक्रारीही करण्यात आल्या. मात्र, अजूनही कंपनीच्या अधिकार्यांनी हे काम मार्गी लावलेले नाही. दोन रस्त्यांमध्ये मोठे गचके टाकून ठेवण्यात आल्याने अनेक चारचाकी वाहनांचे नुकसान होत आहे. दोषपूर्ण काम करणार्या कंपनीवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. याकडे लक्ष देत तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. दत्तपूर ते आरती टॉकीज चौक या रस्त्याचे काम करीत असताना कंपनीने ३५ च्या वर झाडे तोडली. मात्र, दुसरी पर्यायी झाडे लावलेली नाही. तोडलेल्या झाडांबाबत ठेकेदारा विरोधात गांधीवादी कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारसह हरित लवादाकडेही तक्रारी केल्या होत्या. मात्र, अजूनपर्यंत या कंपनीवर कारवाई झाली नाही. या मार्गावर वृक्ष लागवड व त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी या कंपनीवर देण्यात आली आहे. मात्र, या रस्त्यावर एकही वृक्ष त्यांनी लावलेला नाही. त्यामुळे या कंपनीवर पर्यावरण कायद्यानुसारही कारवाई करण्याची मागणी गांधीवाद्यांनी केली आहे. ऑगस्ट महिन्यात काही झाडं लावून वृक्षारोपनाचा देखावा करण्यात आला होता. आज मात्र तेही झाडं जीवंत आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.