हिंमत असेल तर एकाच व्यासपीठावर समोरासमोर या, होऊन जाऊ दे; उद्धव ठाकरेंचं शिंदेंना उघड आव्हान

मुंबई/प्रतिनिधी प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जावं लागतं. हिंमत असेल तर मैदानात या, एकाच व्यासपीठावर या समोरासमोर काय ते होऊन दाऊ देत माझी पूर्ण तयारी आहे, असं खुलं आव्हान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. ते मुंबईत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पंच्च्याहत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कोर्टात जावं लागतंय. मैदानासाठी कोर्टात जा, उमेदवारीसाठी कोर्टात जा. अरे हिंमत असेल तर मैदानात या. माझी तर तयारी आहे. मी मैदानात उतरलेलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही याची तयारी करण्यापेक्षा एकाच व्यासपीठावर समोरासमोर येऊ आणि होऊन जाऊ देत काय व्हायचं ते, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं.