ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली/प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांची निवड करण्यात आली आहे. १९५९ ते १९७३ या काळात आशा पारेख बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री राहिल्या आहेत. अभिनेत्री आशा पारेख यांनी “माँ’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. आशा पारेख भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. आशा पारेख यांचा मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट “दिल दे के देखो’ होता. हा चित्रपट यशस्वी झाला. सुमारे ८० चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलेल्या आशा पारेख यांचे सर्व चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले. ज्यात “जब प्यार किसी से होता है’, “घराना’, “भरोसा’, “मेरे सनम’, “तीसरी मंजिल’, “दो बदन’, “उपकार’, “शिकार’, “साजन’, “आन मिलो सजना’ हे काही विशेष गाजलेले चित्रपट आहेत.