समुद्रपूरच्या शेत शिवारात दर्शन देणाऱ्या “रॉकी’ची चंद्रपूर जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल

वर्धा/प्रतिनिधी समुद्रपूरच्या शेत शिवारात दर्शन देत थेट नागपूर जिल्ह्यात एन्ट्री करून पुन्हा वर्धा जिल्ह्यात परतणाऱ्या पट्टेदार वाघाचा सध्या समुद्रपूर तालुक्यातील तळोदी शिवारात मुक्त संचार होत आहे. या रुबाबदार वाघाने अद्याप मनुष्यावर हल्ला केला नसला तरी परिसरात दहशतीचे वातावरण आहे. येत्या २४ तासांत हा वाघ शिकार करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. संबंधित पट्टेदार वाघाचा तोरा बघून त्याला वन्यजीव प्रेमींकडून ‘रॉकी’ असे संबोधले जात असून तो सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने तळोदी भागातील पंधरा गावांना वनविभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वाघाच्या प्रत्येक हालचालीवर वनविभागाच्या तब्बल पाच चमूचा वॉच असून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित परतता यावे म्हणून वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून स्थानिक नागरिकांचे सहकार्य घेत विशेष प्रयत्न केले जात आहेत.