लम्पीसदृष्य लक्षणे आढळलेल्या गावांना जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी

वर्धा/प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यात आर्वी व आष्टी तालुक्यात काही ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग सदृष्य लक्षणे आढळून आली आहे. या गावांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या भेटीत त्यांनी पशुपालकांशी संवाद साधला व बाधीत जणावरांमुळे जिल्ह्यात ईतरत्र प्रादुर्भाव होणार नाही, याच्या दक्षता घेण्याच्या सुचना केल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, तहसिलदार उमेश चव्हाण, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी श्री.वासनिक, श्री.बोरकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात आर्वी शहर व या तालुक्यातील हिवरा (तांडा), सावळापूर, आष्टी तालुक्यातील वडाळा या गावांमध्ये लम्पी सदुष्य लक्षणे असलेली जनावरे आढळून आली आहे. त्यामुळे ही गावे बाधित क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आली आहे. या गावालगतच्या ५ किलोमीटर परिसरातील गावे सतर्कता क्षेत्र म्हणुन आधीच घोषित करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आर्वी तालुक्यातील सावळापुर येथे भेट दिली. येथील बाधीत जनावरांची त्यांनी पाहणी केली तसेच पशुपालकांशी संवाद साधला. याच तालुक्यातील हिवरा (तांडा) व आर्वी शहरालगतच्या सारंगपुरी येथे देखील भेट देऊन पाहणी केली व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने आष्टी तालुक्यातील बाधीत गावाला देखील भेट दिली. लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने उपाययोजना जारी केल्या असून त्याचे तंतोतंत पालन करण्यासोबतच पशुसंवर्धन विभागाने अधिक दक्ष राहून या परिस्थितीत काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी भेटी दरम्यान पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.