वर्धा येथे गांधी जयंतीदिनी नदी महोत्सवाचा शुभारंभ

वर्धा/प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांचे पुनरुज्ज्ाीवन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असून या अंतर्गत जनजागरण करण्यासाठी “नदी महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवाचा शुभारंभ येत्या २ ऑक्टोबरपासून वर्धा येथे होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप वर्धा येथे होणार असून या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, आमदार पंकज भोयर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून याचवेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून नदी महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या आढाव्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वर्धा मतदार संघाचे आमदार पंकज भोयर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, पुरातत्व संचालक डॉ.तेजस गर्गे आदी उपस्थित होते.