नववर्षाच्या स्वागताला जिल्ह्यातील १ हजार मंदिरात हनुमान चालिसा पठन
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : मद्यधूंद होऊन मध्यरात्री इंग्रजी नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ही आपली संस्कृती नाही. या विभंत्स प्रकारातून भावी पिढीला बाहेर काढण्यासाठी तसेच देशात सुख शांती व सामाजिक सद्भाव वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने नव वर्षाच्या पहिल्या दिवशी आज १ रोजी सकाळी जिल्ह्यातील १ हजार मंदिरांमध्ये सामूहिक हनुमान चालिसाचे पठन झाले. यावर्षीचा हनुमान चालिसा पठन कार्यक्रमाला सर्वच पक्षातील नेत्यांनी हजेरी लावल्याने सर्वपक्षीय झाले, हे उल्लेखनिय! गेल्या १६ वर्षांपासुन इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी हनुमान चालिसा पठन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेल्यावर्षी शहरात ३०० आणि जिल्ह्यात ७५० मंदिरांत सामूहिक पठन झाले होते. तो आकडा यावर्षी वाढला. जिल्ह्यात जवळपास १ हजार मंदिरांमध्ये हनुमान चालिसा पठन झाल्याची माहिती श्रीराम मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष संजीव लाभे यांनी दिली.
स्थानिक श्रीराम मंदिर गोलबाजार येथे बांधकाम सुरू असल्याने महादेव मंदिरात सकाळी ९.३० वाजता सामूहिक हनुमान चालिसा पठन कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी संत सयाजी महाराज, मुकेशनाथ महाराज, संजीव लाभे, समाजसेवक अनिल नरेडी, वर्धा अर्बन बँकेचे अध्यक्ष सुधाकर साटोणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. श्रीराम शोभा यात्रा समिती, श्रीराम मंदिर देवस्थानच्या वतीने आयोजित सामूहिक हनुमान चालिसा पठन कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, वर्धा नपचे नवनियुत नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, काँग्रेसचे नेते डॉ. अभ्युदय मेघे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री, सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व समाजसेवक प्रदीप बजाज, वर्धा नागरी बँकेचे संचालक रयजकुमार डहाके, बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन पावडे, उद्योजक गोविंद भूत, माकपाचे नेते यशवंत झाडे यांनी भेट दिली.
कार्यक्रमाला श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष अरुण काशिकर, राजेंद्र उमाटे, कमल कुलधरिया, शिरीष जवदंड, अनिरुद्ध जोशी, मधुकर जोशी आदींची उपस्थिती होती. राम मंदिराच्या वतीने आवाहन केल्यानुसार शहरा नजिकच्या आलोडी, साटोडा, वरुड, सेवाग्राम, बोरगाव, सिंदी (मेघे), कारला, पिपरी (मेघे), सावंगी या गावांसह देवळी, आर्वी, हिंगणघाट, सेलू तालुयातही सामूहिक हनुमान चालिसा पठन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते.









