२७०० किलो प्रतिबंधित ‘आफ्रिकन थाई मागुूर’ मासे नष्ट

आर्वी तालुक्यात मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम

वर्धा : आर्वी तालुक्यातील मौजा निंबोली (शेंडे) परिसरात मत्स्यव्यवसाय विभागाने दोन दिवस विशेष मोहीम राबवून प्रतिबंधित ‘आफ्रिकन थाई मागुूर’ माशांच्या अवैध मत्स्यपालनार मोठी कारवाई केली. या कारवाईत शेततळ्यामधून सुमारे २ हजार ७०० किलो जिवंत मागुूर मासे जप्त करून त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

मत्स्यव्यवसायाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यव्यवसाय, महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. ही मोहीम मत्स्यव्यवसायाचे सहायक आयुक्त स्वप्नील वालदे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी राहुल जाधव, आर्वीचे पोलिस उपनिरीक्षक महेश राठोड, हवालदार मंगेश वाघाडे, चेतन बोरकर, नेरीचे तलाठी अमोल खंडारे, महसूल सेवक अमोल शेंडे, निंबोली (शेंडे) येथील उपसरपंच सुरेखा कदम यांच्या समक्ष पार पडली.

आफ्रिकन थाई मागुूर हा मासा दूषित पाण्यात वाढणारा व निकृष्ट खाद्य खाणारा मासा आहे. या माशाच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम संभवतात. मांसाहारी व आक्रमक प्रवृत्तीच्या या माशामुळे स्थानिक प्रजातींना व नैसर्गिक परीसंस्थांना मोठा धोका निर्माण होतो. या माशामुळे स्थानिक प्रामाणिक मत्स्यपालकांना योग्य बाजारपेठ आणि न्याय मिळण्यास अडचण निर्माण होते.

पर्यावरण व मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या थाई मागुूरचे पालन किंवा विक्री प्रतिबंधत्मक आहे. त्यामुळे या माशाची पैदास किंवा विक्री करू नये आणि जिल्ह्यात इतर ठिकाणी कोणी थाई मागुूरचे पालन किंवा विक्री करत असल्यास योग्य कार्यवाहीसाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयास कळवावे, असे सहायक आयुक्त स्वप्नील वालदे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *