आता रेशनऐवजी रक्कम; साडेआठ हजार शेतकऱ्यांना लाभ

वर्धा/प्रतिनिधी विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना आता रेशनऐवजी दरमहा १७० रुपयांचा लाभ त्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत २ हजार ४६६ कार्डधारक असून, ८ हजार ७४६ शेतकरी लाभार्थीच्या खात्यात जुलैपर्यंतची रक्कम टाकण्यात आली आहे. अन्य रेशनकार्डधारक शेतकऱ्यांप्रमाणे या शेतकऱ्यांनाही यापूर्वी दोन रुपये किलो तांदूळ व तीन रुपये किलो गव्हाचा लाभ देण्यात येत होता.

मात्र, या योजनेत यानंतर धान्य पुरविता येणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने ३१ मे व १ सप्टेंबर २०२२ रोजी शासनाला कळविले आहे. त्यामुळे या रेशन कार्डधारकांना आता रेशनधान्याऐवजी दरमहा १५० रुपये देण्याचे पुरवठा विभागाने सुरू केलेले आहे. त्यानंतर या रकमेमध्ये २० रुपयांनी वाढ करण्यात आल्याने आता प्रतिलाभार्थी १७० रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थीना संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्ज द्यावा लागतो व अर्जाचा नमुनादेखील तेथेच मिळतो. अर्जासोबत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची व रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत जोडावी लागत असल्याची माहिती आहे.