तळागाळातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
वर्धा/प्रतिनिधी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेतला. शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना देण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा अशा सुचना केली. जिल्ह्यातील विविध विभागाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जीतीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सादरीकरणाव्दारे जिल्ह्यात राबविल्या जाणा-या योजनांची व उपक्रमाची माहिती राज्यपालांना दिली. जिल्ह्यात होत असलेल्या विकास कामे, योजनांची अंमलबजावणी व नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. पारंपरिक पीक पद्धतीसोबतच बहुपिक पध्दतीचा अवलंब करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या तज्ञाच्या मदतीने जनजागृती मोहीम राबविण्याची सूचना राज्यपालांनी केली.
शेती व शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबवित आहे. किसान सन्मान निधी, एक रुपयात पीक विमा यासारख्या योजना असूनही शेतकरी आत्महत्या का होतात यावर कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने अभ्यास करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी केली. कृषी, आरोग्य सेवा, सिंचन, ग्रामीण पाणी पुरवठा, अमृत महा आवास योजना, शिक्षण इत्यादी विषयांचा राज्यपालांनी या बैठकीत आढावा घेतला. बचत गटांच्या उत्पादकांना बाजारपेठ मिळावी यासाठी वर्धा येथे उभारण्यात आलेल्या वर्धिनी विक्री केंद्राचे राज्यपालांनी कौतुक केले. बचत गटांच्या उत्पादकांना व्यापक बाजारपेठ मिळावी यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण सेवादूत प्रकल्पाची त्यांनी माहिती घेतली. जिल्ह्यात पोलीस विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी यावेळी दिली. सायबर सुरक्षा अभियान, स्मार्ट ई-बिट, मुद्देमाल व्यवस्थापन पद्धती व सेवा कार्यप्रणाली या माध्यमातून वर्धा पोलीस स्मार्ट पोलिसिंग करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उप वनसंरक्षक हरविरसिंह, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुजर गोहाड, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत ज्ञानदा फणसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता दिक्षित-गौर, आदिवासी विकासचे प्रकल्प संचालक दिपक हेडाऊ, सहाय्यक संचालक कौशल्य विकास निता औघड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चेतन शिरभाते व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.