लोकसभा निवडणुका मार्चआधीच जाहीर होणार!

नवी दिल्ली/प्रतिनिधी देशात लोकसभा निवडणुका कधी जाहीर होणार याबाबत कोणीही निश्चित सांगत नसून अनेकजण वेगवेगळ्या तारखा सांगत आहेत. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चआधीच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ नये यासाठी ३१ जानेवारीपर्यंत निवडणूक संदर्भातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सर्व बदल्या पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने यासंदर्भात तसे पत्रच राज्य सरकारला पाठवले आहे.

यामुळे देशात मार्चआधीच निवडणुकांचा कार्यक्रम लागू केला जाण्याची शक्यता आहे. अनेक पक्षांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजप महायुती आणि इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे देशभरात लोकसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आलेला पाहायला मिळत आहे. देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोग क्शन मोडमध्ये आले आहे. निवडणुकांच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोग राज्यांच्या दौऱ्याना प्रारंभ केला आहे. आयोग सर्व प्रथम आंध्र प्रदेश व तामिळनाडूचा दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.