वर्धा येथे साकारणार इंक्युबेशन व बिझनेस फॅसिलिटी सेंटर

वर्धा/प्रतिनिधी सर्वसामान्य होतकरू युवक व नागरिकांकरीता स्टार्टअप व नाविन्यपूर्ण उद्योग यांना प्रोत्साहन मिळावे तसेच जिल्ह्यात नवउद्योजक निर्माण व्हावे याकरिता वर्धा येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून इंक्युबेशन व बिझनेस फॅसिलिटी सेंटर उभे राहणार आहे. यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भारतीय प्रबंधन संस्था व जिल्हा प्रशासन यांच्यात सामजंस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कराराप्रसंगी पालकमंत्र्यांसह खा.रामदास तडस, आ.रामदास आंबटकर, आ.रणजित कांबळे, आ.डॅा.पंकज भोयर, आ.समीर कुणावार, आ.दादाराव केचे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, भारतीय प्रबंधन संस्थेचे संचालक भिमराया मेत्री तसेच शिवाजी धवड व कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या सहाय्यक संचालक निता औघड उपस्थित होत्या.

वर्धा येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या परिसरात कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या या सेंटरची स्थापना भारतीय प्रबंधन संस्था व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. याकरिता ५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात आयआयएम व जिल्हा प्रशासन यांच्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या इंक्युबॅशन व बिझनेस फॅसिलिटी सेंटरमध्ये जिल्ह्यातील उद्योगाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या किंवा उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या उद्योगावर आधारित विविध योजना, कर्ज मिळवण्यासाठी लागणारे मार्गदर्शन, उद्योगांमध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या तज्ञांचे मार्गदर्शन इत्यादीची सुविधा उपलब्ध असणार आहे. या सेंटरमध्ये उद्योगावर आधारित विविध चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे. उद्योग स्थापनेसाठी आवश्यक प्रस्ताव, तांत्रिक बाबी, कर्ज, शासनाच्या विविध योजना याची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे हे इंक्युबॅशन सेंटर वर्धा जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचे सेंटर म्हणून उदयास येणार आहे.