उपराजधानीत थंडी, पण राजकीय तापमान वाढले, आजपासून अधिवेशन

नागपूर/प्रतिनिधी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत असून, त्यानिमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ दोन आठवडे नागपुरात मुक्कामी असणार आहे. एकीकडे पावसाळी वातावरण आणि त्यामुळे तापमानात घट झाली असतानाच अधिवेशनात सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा संघर्ष रंगणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.अधिवेशनासाठी राज्यातील विविध पक्षांचे आमदार नागपुरात आले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आरोप प्रत्यारोप होणार आहे. विरोधी पक्ष नेते सत्ताधारी नेत्यांवर काय आरोप करतात आणि त्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय उत्तरे देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी आज महाविकास आघाडीची बैठक होणार असून त्यात अधिवेशनात सरकारला कसे घेरायचे यांबाबत रणनीती ठरविण्यात येणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे नागपुरात असून विरोधी पक्षाचे इतर नेते नागपुरात आले आहेत. अधिवेशन तीन आठवडे चालणार असले तरी कामकाजाचे दिवस दहाच आहेत. पहिला आठवड्यात दोनच दिवस तर तिसऱ्या आठवड्यात तीन दिवस कामकाज आहे. फक्त एकच आठवडा पाच दिवस कामकाज आहे.