जीवन चोरे यांच्या “रोखठोक तुका’ने रसिकांना जिंकले

वर्धा/प्रतिनिधी “ेशास तुका ध्यास तुका, तुक्याचीच आस… तुकोबाच्या विचारांची मांडतो आरास’ असा उद्घोष करीत संत तुकारामांच्या अभंगांचा आधार घेत लोककलावंत जीवन चोरे यांनी सादर केलेला ‘रोखठोक तुका’ हा संगीतमय संवादी कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात रसिकांची भरभरून दाद मिळवून गेला. सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात जय जय रामकृष्ण हरी या वारकरी संप्रदायाच्या परंपरागत जयघोषाने आणि समाजाला दिशा देणाऱ्या संत आणि समाजसुधारकांच्या नामस्मरणाने करण्यात आली. प्रबोधन आणि मनोरंजनाचा मेळ घालत जीवन चोरे यांनी जगद्गुरू संत तुकारामांच्या जीवनकार्याची मांडणी करतानाच वर्तमान काळातील कौटुंबिक व सामाजिक समस्यांनाही वाचा फोडली. सद्यकाळातील वास्तवाची जाणीव करून देताना तुकारामांच्या अनेक अभंगांचे दाखले त्यांनी यावेळी दिले.

वेद वाचण्यापेक्षा समाजाच्या वेदना वाचणे म्हणजे अध्यात्म असून समाजसुधारकांच्या जयंत्या नि पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा अंगीकार समाजाच्या भल्यासाठी करावा, असे उद्गार चोरे यांनी काढले. आज बाबाबुवांच्या मागे न लागता आणि चमत्कारांच्या आहारी न जाता ज्ञानाची व विज्ञानाची कास धरा, असे आवाहनही जीवन चोरे यांनी केले. अंधश्रद्धा, कुप्रथा, धार्मिक कर्मकांड, स्त्रीभ्रूणहत्या, बेकारी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या, व्यसनाधीनता, विलासी वृत्ती, समाजमाध्यमांचा भस्मासुर याबाबत रोखठोक मांडणी करीत माणुसकीचा मार्ग धरा आणि दैववादी न राहता कर्तव्यशील व्हा, असे आवाहन त्यांनी तरुण पिढीला केले. जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्यांची दुरवस्था सरकार नावाच्या सावकाराने केली आहे. दुष्काळात लोकांची कर्जपत्रे इंद्रायणीत बुडविणाऱ्या तुकोबांकडून काही शिका आणि संपूर्ण कर्जमाफी करून घामाचे योग्य दाम द्या, अन्यथा तुकोबाची काठी शेतकरी उगारतील, असा इशाराही या प्रबोधन कार्यक्रमातून लोककलावंत जीवन चोरे यांनी दिला. कार्यक्रमाची सांगता विठुनामाच्या गजराने करण्यात आली. रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत सादर झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन निर्माते व दिग्दर्शक हरीश इथापे आणि साहित्यिक संजय इंगळे तिगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर ठाकरे यांनी केले. ‘रोखठोक तुका’चे संगीत दिग्दर्शन अजय हेडाऊ यांचे असून मंचावरील सादरीकरणात जीवन चोरे यांच्यासह ख्यातनाम गायक किशोर अगडे, अरविंद बटाले, दिलीप झाडे, सुनील कुडे यांनी सुरेल स्वरात अभंग व गीतरचना सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. गायकांना अरविंद बटाले (संवादिनी), निलेश इंगळे (तबला), आशिष गायधन (मृदंग), रवींद्र खंडारे (बासरी), गिरीश शर्मा (ऑर्गन) यांची सुश्राव्य संगीतसाथ लाभली. या कार्यक्रमात तुकोबांच्या अभंग रचनांसोबतच संत कबीर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बहिणाबाई चौधरी, मंगेश पाडगावकर, नामदेव ढसाळ, ज्ञानेश वाकुडकर, भैया पेठकर, संजय इंगळे तिगावकर, नितीन देशमुख यांच्या रचना सादर करीत जीवन चोरे व सहकलावंतांनी तब्बल दोन तास हा कार्यक्रम फुलवत नेला.