विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम प्रभाविपणे राबवा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी जिल्ह्यात दि.२६ जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिम कालावधीत जिल्ह्यातील ५२० ग्रामपंचायतीमध्ये चित्ररथाद्वारे केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी तालुका व ग्रामस्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन समिती गठीत करावी. योजनांच्या जनजागृतीचे चांगले नियोजन करून मोहिम यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केल्या. विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विेशास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रा.ज. पराडकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ, नगर पालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त हर्षल गायकवाड, अपूर्व फिरके, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ.स्मिता हिवरे आदी उपस्थित होते.

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या ३४ योजनांची चार चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील ५२० ग्रामपंचायतीमधून जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्राकडून जिल्ह्यात दि.२३ नोव्हेंबर रोजी चार चित्ररथ दाखल होणार असून प्रती चित्ररथ दोन तालुका याप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करण्यात येणार आहे. चित्ररथ फिरविण्यात येणाऱ्या गावांचे रोड मॅपींग करावे. यासाठी संबंधित यंत्रणांनी तालुका व ग्रामस्तरावर तलाठ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, कृषि सेवक, ग्रामसंघ सदस्य, आशा व अंगणवाडी सेविका यांची समिती तसेच लोकप्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली उत्सव समिती गठीत करावी, अशा सूचना राहुल कर्डिले यांनी दिल्या. समितीद्वारे योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करुन कार्यक्रमाच्या ठिकाणी योजनांवर आधारित नुक्कड, नाटक, कलापथकाचे आयोजन करावे. त्याचबरोबर योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची व्हिडिओ चित्रफित तयार करुन कार्यक्रमाच्या ठिकाणी तसेच सोशल मीडियाद्वारे प्रसारित करावी आणि केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बैठकीत दिल्या. नागरिकांनी चित्ररथाद्वारे करण्यात येत असलेल्या केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.