पत्रमहर्षी छत्रपती चेटुले : आदरांजली

पत्रमहर्षी छत्रपती चेटुले : आदरांजलीश्री. छत्रपती महादेवराव चेटुले, दैनिक भंडारा पत्रिकाचे सल्लागार संपादक व महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यविकास विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक संचालक, वय वर्षे ६६ यांचे दि.३ नोव्हेंबर रोजी नागपुरात हृदयविकाराने दु:खद निधन झाले. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर चेटुले कुटूंबियाच्या भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील वृत्तपत्रांच्या सर्वांगीण विकासात व आधुनिक करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने जिल्हा वृत्तपत्र विश्वाचा व जिल्हा पत्रकार संघटनांचा एक जवळचा सल्लागार गमावला आहे. माझे चेटुले कुटूंबियांशी दोन पिढ्यांचे संबंध. लाखनी-भंडाराचे भात पिरु घेणारे समृद्ध शेतकरी श्री. महादेवराव चेटुले यांना टिळक-आगरकरांच्या राष्ट्रप्रेमी पत्रकारितेने डंख केला आणि त्यांची लाखनीवरुन साप्ताहिक “लाखनी समाचार’ व भंडाऱ्यावरुन साप्ताहिक “भंडारा पत्रिका’सुरु केली आणि पत्रकारितेत महादेवराव इतके गुंतले की मग शेतकरी हा त्यांचा दुय्यम व्यवसाय झाला व पत्रकारितेने पहिले स्थान घेतले. पत्रकारांच्या हक्कासाठी ते लढ्यात आघाडीवर होते. पुढे भंडाऱ्यावरुन प्रकाशित “भंडारा पत्रिके’चे दैनिकात रुपांतर झाले. दैनिकाची जबाबदारी सांभाळण्यासाठी महादेवरांचे धाकटे पुत्र रमेश भंडाऱ्याला स्थायिक झाले.

भंडारा पत्रिकेला संगणक, नवीन छपाई मशीन व नवीन इमारतीत शिफ्ट करण्याच्या कामात महादेवरांचे ज्येष्ठ पुत्र-छत्रपतींचा सिंहाचा वाटा होता. नागपूरवरुन छत्रपतींचा सल्ला मिळत होता आणि तिकडे भंडाऱ्यात दैनिक “भंडारा पत्रिकेची’ आधुनिक स्वरुपात घोडदौड आघाडीवर सुरु होती. महादेवराव चेटुले यांना आपल्या या ज्येष्ठ पुत्राचा मोठा अभिमान होता. महादेवराव त्याला लाडाने सी.एम. म्हणायचेत. छत्रपती महादेवरावची पहिली दोन आद्याक्षरे या सी.एम. ने पुढाकार घेऊन “भंडारा पत्रिकेसाठी’ नवीन आधुनिक कलर छपाई मशीन विकत घेतली. त्याच्या उद्घाटनासाठी म्हणऊन मी व माझे मित्र श्रवण जेजाणी महादेवरावांच्या आग्रहावरुन भंडाऱ्याला गेलो आणि तिथे आमची या सी.एम.शी भेट झाली. पुढे ओळख व त्यातूनच मग दाट मैत्री झाली. आम्ही देखील त्यांना मग सी.एम.च म्हणू लागलो आणि ते देखील होकार देऊ लागले. आता आमची मैत्री ३० वर्षांची झाली. सुख-दु:ख एक झाले. अडचणींची वाटणी केली. मत्स्यविकास विभागात छत्रपती भराभर पदोन्नती घेत होते. जिल्हा मत्स्यविकास अधिकारी झालेत.

सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आला. त्याचवेळी नागपुरात त्यांनी घर बांधले. मुलगी रोमाने पदवी मिळविली. भंडाऱ्याच्या पेपरची जबाबदारी रमेश सांभाळत होता. नवीन पिढीने पत्रकारीता व्यवसाय गोंदिया व नागपूर जिल्ह्यात वाढवला. कालचक्र फिरत होते. दुर्धर रोगाने रमेशचे निधन झाले. वृद्धापकाळाने महादेवराव गेलेत. एव्हाना छत्रपती रिटायर झाले होते. पूर्ण ताकदीनिशी त्यांनी घरच्या सर्व वृत्तपत्रांचा कारभार आपल्या पंखाखाली घेतला. सोबतीला रोमा होती. मदतीला राकेश होता. रिटायर झाल्यामुळे आता सी.एम. ने जिल्हा पत्रकारांच्या वृत्तपत्रांच्या अडीअडचणी सरकार दरबारी मांडण्यात छत्रपतींनी मदत केली. दरम्यान मी मंत्रालयातून नागपूरला बदलून आलो होतो.

विविध कारणास्तव छत्रपतींशी संपर्क येत होता. जिल्हा पत्रकार संघटनांच्या विविध समस्या घेऊन ते वर्धेचे पत्रकार निरज त्रिपाठी, चारु पाटील, अनिल मेघे, चंद्रपूरचे बंडु लडके यांच्यासोबत कार्यालयात येत होते. समस्यांची उकल होत होती. मैत्र वाढत होते. वृत्तपत्र यादीवर घेणे, अधिस्विकृती नियमावली, पत्रकारितेबाबत शासकीय नियमांचे जाणकार तेव्हा नागपुरात तीन जण होते. दै. राष्ट्रदूतचे नवीन अग्रवाल, दै. महासागरचे श्रीकृष्ण चांडक व तिसरे होते छत्रपती चेटुले. नवीन अग्रवाल आधीच गेलेत. आज छत्रपती महादेव म्हणजे आमचे सी.एम. गेलेत. जिल्हा वृत्तपत्रांचा मार्गदर्शक गेला. जिल्हा पत्रकार संघांचा सल्लागार गेला. एक आधार गेला. ही पोकळी कशी भरणार?

– शरद चौधरी (९८२२७००४४७)