आयुर्वेद रुग्णालयात रंगली चंद्राच्या साक्षीने संगीत रजनी कोजागिरीला शेकडो नागरिकांनी घेतला औषधीचा लाभ

वर्धा/प्रतिनिधी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित सालोड (हिरापूर) येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व अनुसंधान केंद्राद्वारे कोजागरी पौर्णिमेनिमित्त आयोजित औषधी वितरण उपक्रमात सुमारे बाराशे नागरिकांनी दमा औषधीचा लाभ घेतला. या कार्यक्रमानिमित्त नागरिकांसाठी ‘चंद्र आहे साक्षीला’ या संगीत मैफलीचे आयोजनही करण्यात आले होते. आयुर्वेद रुग्णालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात आयोजित या संगीत रजनी व दमा औषधी वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे व पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोजागरी पौर्णिमेनिमित्त सप्तरंग प्रस्तुत ‘चंद्र आहे साक्षीला’ ही मराठी व हिंदी गीतांची सुरेल मैफल सादर झाली. गायक आनंद निधेकर, स्वाती निधेकर व स्मित वंजारी या गायकांनी हीच अमुची प्रार्थना, हिरवा निसर्ग, मन उधाण वाऱ्याचे, शारद सुंदर चंदेरी राती, नीले नीले अम्बर पर, तुम जो मिल गये हो, रात का समां, रंगीला रे, होटों में ऐसी बात, चंद्र आहे साक्षीला आदी सुरेल गाणी या संगीत मैफलीत सादर करून रसिकांची दाद मिळविली.

या गायकांना चारू साळवे (ऑर्गन), राजेंद्र झाडे (ऑक्टोपॅड), स्वप्नील कावळे (ढोलक), दीपक भांडेकर (तबला), रितेश गुजर (गिटार) यांनी संगीतसाथ केली. मैफलीचे ओघवते निवेदन नागपूर येथील हास्यकलावंत देवानंद वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. देवयानी दासार यांनी केले. रात्री १२ वाजता आयुर्वेद महाविद्यालयाचे समन्वयक व्ही. आर. मेघे, अधिष्ठाता डॉ. वैशाली कुचेवार व उपस्थित अतिथींच्या हस्ते आयुर्वेदानुसार तयार करण्यात आलेला दम्यावरील औषधी काढा कोजागरीच्या दुधासोबत वितरित करण्यात आला. तत्पूर्वी दिवसभर चाललेल्या दमा रुग्ण तपासणी शिबिरात डॉ. सौरव देशमुख, डॉ. रोहित वासकर, डॉ. प्रसाद येवले, डॉ. अिेशनी पारधेकर, डॉ. समता सेवास्कर, डॉ. तृप्ती ठाकरे, डॉ. पियुष पारधेकर या ज्येष्ठ तसेच युवा आयुर्वेदाचार्यांनी आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपअधिष्ठाता डॉ. गौरव सावरकर, डॉ. भरत राठी, डॉ. मुजाहिद खान, डॉ. मकरंद सोनारे, डॉ. प्रेमकुमार बडवाईक, डॉ. अमोल देशपांडे, डॉ. अक्षय पारगावकर, रितेश डोर्लीकर, नितेश बुरबुरे, वंदना फटींग तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता.