मुख्यमंत्री शिंदेंच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात गोंधळ; यवतमाळमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

यवतमाळ/प्रतिनिधी “शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ येथे उपस्थित आहेत. त्यांच्या कार्यक्रमावेळी मराठा आंदोलकांनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. कार्यक्रम सुरु असताना बाहेर गोंधळ घालण्यात आल्याची माहिती सामने दिली आहे. शासन आपल्या कार्यक्रमाबाहेर मराठा आंदोलकांनी गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. गोंधळ घालणाऱ्या आंदोलकर्त्यांना गाडीमध्ये टाकून त्यांना बाहेर नेण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण सुरु होण्याआधी आंदोलकांनी गोंधळ घातला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी हल्ला केला. त्यांचे घर आणि गाडी आंदोलकांनी जाळली. अनेक ठिकाणी आंदोलकांनी महामार्गांवर रास्ता रोको केला आहे. अनेक नेत्यांचा ताफा अडवला जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने सहाव्या दिवसात प्रवेश केला आहे. त्यांनी कडकडीत उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाच्या लोकांच्या विनंतीवरुन त्यांनी काही घोट पाणी पिले आहे. दरम्यान, उपोषण सुरुच राहणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले आहेत. मी उपोषण सोडलं तर मराठा आरक्षण कोण देईल असा सवाल त्यांनी केला आहे. १ तारखेपासून आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, सरकारकडून मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज झालेल्या बैठकीमध्ये जवळपास ११ हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संदिप शिंदे यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल सरकारने स्वीकारला आहे. ज्या लोकांच्या नोंदी आढळतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी सरकारने सुरु केली आहे. असे असले तरी जरांगे पाटील यांनी सरसकट आरक्षण द्यावे, ही मागणी कायम ठेवली आहे.