केरळमध्ये प्रार्थनास्थळी एकापाठोपाठ तीन भीषणस्फोट, १ जणाचा मृत्यू, ३६ हून अधिक जखमी

एर्नाकुलम/प्रतिनिधी केरळमधील कलामासेरी येथील ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनास्थळी सकाळी ९ च्या सुमारास भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात १ जणाचा मृत्यू झाला असून, ३६ हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलं नाही. सकाळी ९ वाजल्याच्या सुमारास स्फोट झाल्याबद्दल पोलिसांना फोन आला. याची माहिती मिळताच अग्निशन दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर एनआयएचे पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. एका पाठोपाठ तीन स्फोट झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे. एर्नाकुलममधील अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. मी पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे. तपासानंतर अधिक माहिती मिळेल. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सुट्टीवर गेलेल्या डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीनं माघारी बोलावलं आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाचे संचाक आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना जॉर्ज यांनी निर्देश दिले आहेत.